पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना मिळालेले हक्क,अधिकाराचा लाभ घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा कार्यक्षम करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाधक्ष शशिकांत हरिदास यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन समारंभात बोलताना केली.
२४ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशभर शासकीय,अशासकीय कार्यालयात ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय समारंभात हरिदास बोलत होते.
अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा भारती सोलवंडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निलेश देठे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,महिला विभाग प्रमुख माधुरी परदेशी हे उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले.
यावेळी बोलताना शशिकांत हरिदास यांनी अनेक विभागात सद्यस्थितीत पुरेशी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध नाही.ती होणे अत्यंत गरजेचे आहे हे अनेक विभागातील उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले.
उदा.ग्राहक न्यायालयात (तक्रार निवारण आयोग)
फर्निचर,स्टाफ,स्टेशनरी,अद्यावत संगणक इ.अपुरे तसेच पुरेशा मुलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. पुरवठा विभागात कार्ड धारकांची ऑनलाईन नावे दाखल होत नाहीत,त्यामुळे पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात.विविध तालुक्यातून अनेक तक्रारी आहेत.
वैधमापन शास्त्र म्हणजेच वजनमापे विभागात अत्यंत तोकडी कर्मचारी/अधिकारी संख्या आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी अवैध वजनमापे वापरली जातात.तपासणी यंत्रणा अपुरी आहे,त्यासाठी तातडीने नियुक्त्या होणे गरजेचे आहे. अगदी सामान्य नागरिक, शेतकरी ग्राहक यांच्या रोजच्या संपर्कातील महसूल विभागातील तलाठ्यांकडेही अद्ययावत लॅपटॉप उपलब्ध नाहीत.जुन्याच संगणक प्रणाली मध्ये काम करावे लागते. त्यामुळे जलद सेवा मिळत नाही.
अत्यंत महत्त्वाच्या अन्न सुरक्षा विभागातही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. भेसळ ओळखण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा नाही.त्यासाठी पुणे येथे नमुने पाठवावे लागतात. अशा अनेक यंत्रणा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाल्याशिवाय ग्राहक आपले अधिकार वापरु शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या हक्क आणि अधिकाराची चर्चा अपुरीच राहणार आहे. शासनाने ग्राहकांना दैनंदिन व्यवहारात अत्यंत आवश्यक व गरजेच्या अशा सर्व प्रशासकीय यंत्रणेमध्ये (ग्राहक तक्रार निवारण आयोग, कार्यक्षम ग्राहक संरक्षण परिषद) मुलभूत सुविधा उपलब्ध करणे हीच मागणी ग्राहक दिनानिमित्त करतो असे ते म्हणाले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक लवकरच घ्यावी अशी मागणी परिषद सदस्य दीपक इरकल यांनी केली.
या समारंभासाठी ग्राहक संरक्षण परिषद सदस्य दतात्रय कुलकर्णी, शशिकांत नरुटे, संतोष उपाध्ये, ऍड.विजय कुलकर्णी तसेच विविध खात्याचे अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी, शिक्षक,परिषदेचे अन्य सदस्य उपस्थित होते. परिषद सदस्य राजन घाडगे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

