पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
भारत आणि पाकिस्तान दरम्यान सन १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय म्हणजे भारतीय लष्कराच्या इतिहासातील सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन युद्धात सहभागी झालेल्या अनुभवी वीरसैनिकांनी केले.
या युद्धातील विजयादिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दक्षिण मुख्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी व या युद्धात सहभाग घेतलेले निवृत्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या युद्धाने बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. भारतीय लष्कराच्या शौर्याबरोबरच सामरिक रणनीतीमुळे उभ्या जगाला स्तिमित करून टाकले. पाकिस्तानचे तब्बल एक लाख सैनिक शरण आले. भारतीय लष्कराकडून या शरणार्थी शत्रू सैनिकांनाही सन्मानाची वागणूक दिली गेली असे सन्मानियांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या कार्यक्रमानंतर सर्व युद्धविरांचा लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (आर्मी कमांडर - दक्षिण कमांड) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मा.कर्नल न्यायपती यांनी या ऐतिहासिक युद्धात सहभाग घेऊन देशासाठी महत्वाची कामगिरी निभावली. लष्करात सेवा करून निवृत्त झाल्यानंतर ते विश्रांती रुग्णालयाच्या माध्यमातून जनसामान्य रुग्णांना अविरत वैद्यकीय सेवा गेल्या बत्तीस वर्षांपासून देत आहेत. आपल्या केअर इंडिया मेडिकल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना कर्करोगाची मोफत सेवा प्रदान करीत आहेत.विशेषतः केमोथेरपीसारखे उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत.या त्यांच्या सत्कार्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

