पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचा 'माजी विद्यार्थी मेळावा' व ‘पदवीप्रदान समारंभ’ आयोजित करण्यात आलेला आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी स्वेरीच्या स्थापने पासूनच्या पहिल्या बॅच पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. तर ‘पदवीप्रदान समारंभ’ करिता मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे.
या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसोबत तसेच इतर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधता येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थी हे त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. 'या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी व मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी उपस्थित रहावे.' असे आवाहन ‘माजी विद्यार्थी संघटना’आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, सचिव डॉ.करण पाटील आणि स्वेरीचे प्राध्यापक वर्ग हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या माजी विद्यार्थी मेळाव्याची व पदवीप्रदान समारंभाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.


