शोषित-वंचितांच्या आत्मसन्मानाला नवा आयाम देणाऱ्या महामानवाला संपूर्ण देशाचे वंदन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि कायदेपंडित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त देशभरात बाबासाहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.
शोषितांना आणि वंचितांना आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणारे, तसेच एकता, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आयुष्य वेचलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आजही या देशाचा कणा आहे. त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी आज पंढरपूर शहरातही आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आज राष्ट्रवादी व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नागेश फाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना फाटे यांनी बाबासाहेबांचे सामाजिक व घटनात्मक योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले. तसेच, उपस्थितांना बाबासाहेबांच्या विचारांवर चालून सामाजिक समतेसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
यावेळी RPI नेते सुनिल जी सर्वगोड, RPI नेते जितेंद्र बनसोडे,पैलवान गायकवाड,भास्कर गायकवाड, विनय शिंदे, निवृत्ती भटकर, नागेश काळे, पत्रकार रामभाऊ सरवदे, चैतन्य उत्पात, रवींद्र शेवडे तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या महान नेत्याच्या कार्यास आणि विचारांना आदराने वंदन केले.


