नवी मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
नवी मुंबईतील बेलापूर येथे क्रेशिया एंटरप्राइजेस या नव्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र मानगावे व सनराईज कॅण्डल, महाबळेश्वरचे संस्थापक व सुप्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने उद्घाटन सोहळा अधिकच गौरवपूर्ण ठरला.
या शुभप्रसंगी गौरव सोमवंशी , अशोक पागिरे तसेच जॉईंट रजिस्टर को-ऑपरेटिव्ह जी. डी. पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून क्रेशिया एंटरप्राइजेसच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा केवळ उद्घाटना पुरता मर्यादित न राहता भविष्यातील व्यवसायिक संधींवर मार्गदर्शन करणारा ठरला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना रविंद्र मानगावे यांनी बेलापूर व नवी मुंबई परिसराचे भविष्य अतिशय आशादायक असल्याचे सांगितले. त्यांनी सविस्तर उदाहरणांसह स्पष्ट केले की, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) हे भारतातील सर्वात मोठे बंदर याच परिसरात आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील याच भागात उभारले जात आहे. यासोबतच पनवेल येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर सध्या मुंबईत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या तोडीस तोड प्लॅटफॉर्म उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व पायाभूत सुविधांमुळे येत्या काळात बेलापूर व नवी मुंबई हे निर्यात, आयात, लॉजिस्टिक्स व विविध व्यवसायांचे प्रमुख केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संधींचा लाभ तरुणांनी घ्यावा व उद्योग-व्यवसायात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माननीय भावेश भाटिया यांनी अत्यंत प्रेरणादायी व उत्स्फूर्त भाषण केले. आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगताना त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहिले, तर यश एक दिवस नक्कीच मिळते. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा व मेहनत या तीन गोष्टींवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास कोणतीही अडचण कायमची नसते, असे प्रेरक विचार त्यांनी मांडले. त्यांच्या भाषणाने उपस्थित तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमात माननीय गौरव सोमवंशी यांनी समायोजित व मुद्देसूद भाषण करत क्रेशिया एंटरप्राइजेसच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर अशोक पागिरे व जी. डी. पाटील यांनीही उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ भातगुणगी यांनी अत्यंत प्रभावी व संयत शैलीत केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रम अधिकच शिस्तबद्ध व रसपूर्ण झाला. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी सोलापुरी हुरडा, चटणी, फरसाण, बोर व शेंगापाळी असा पारंपरिक गावरान मेव्याचा आस्वाद ठेवण्यात आला. नवी मुंबई – बेलापूर परिसरात प्रथमच अशा गावरान मेव्याचा अनुभव अनेकांनी घेतला. या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वांनी काशिनाथ भातगुणगी सरांचे विशेष कौतुक केले.
क्रेशिया एंटरप्राइजेसचे प्रमुख म्हणून महबूब कासार, अहमद कासार तसेच विक्रम माने यांनी सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून कृषी व निर्यात क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील व्यवसायिक संधींचा योग्य वापर करून तरुणांना रोजगार व उद्योगाच्या संधी निर्माण करून देण्याचा मानसही त्यांनी यावेळी सांगितला.
एकूणच क्रेशिया एंटरप्राइजेसच्या बेलापूर येथील कार्यालयाचे उद्घाटन हा केवळ एक कार्यक्रम न राहता, नवी मुंबईच्या व्यवसायिक भविष्याचा दिशादर्शक ठरला. मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रेरणादायी विचार व उपस्थितांची उत्स्फूर्त दाद यामुळे हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.

