पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीकडून तालुक्यात ऑफलाईन अर्ज कामकाजाला सुरुवात झाली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2025 या अनुषंगाने या समितीमार्फत स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना काही कारणांमुळे खरीप हंगाम-2025 पीक नोंदणी करता आली नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने हा पर्याय ठेवला आहे. ज्या शेतकऱ्यांची खरीप 2025 ची ई-पिक पाहणी नोंद झाली नसेल त्यांनी 24 डिसेंबर पर्यंत तलाठी यांच्याकडे लेखी अर्ज करावा. ग्रामस्तरीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणी प्रत्यक्ष करण्यात येणार असून, मंडल अधिकारी याचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे
ग्रामस्तरीय समितीकडून प्राप्त झालेला अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर तपासला जाणार असून, समितीच्या कामकाजाचा दररोज आढावा घेऊन दैनिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी आधीच गाव नमुना 12 वरती झालेली आहे. त्यामध्ये आता नव्याने कोणतीही दुरुस्ती केली जाणार नसून ही प्रक्रिया केवळ खरीप हंगाम 2025 मध्ये ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठीच राहणार आहे. ई-पिक पाहणी राहिलेले शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

