गादेगांव प्रतिनिधी तेज न्यूज
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी ०१ गादेगांव व व इंटास कंपनीच्या वतीने मौजे गादेगांव येथे 'वंध्यत्व निवारण शिबिर' आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरांतर्गत जनावरांच्या बांझपणाच्या सर्व समस्यांवर तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. जनावरांच्या गर्भवाढीसाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी व उपचार यासंदर्भात डॉ.विजय कोळेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जनावरांतील संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ.कोळेकर यांनी यावेळी केले.
जनावरांमधील बांझपणा (वंध्यत्व) हे पोषण, रोग, व्यवस्थापन आणि हार्मोनल असंतुलनामुळे होतो, ज्यामुळे जनावरे वेळेत गाभण राहत नाहीत. यावर उपचार म्हणून संतुलित आहार, स्वच्छ गोठा, नियमित लसीकरण, जंतनाशक औषधे देणे आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने हार्मोन्सचे उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉ.कोळेकर यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना शेतीसोबत पशुधन हा एक अतिशय महत्त्वाचा जोडधंदा असून शेतकऱ्यांनी याकडे एक व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे. शासनाने ही नुकताच पशुधनाला कृषी चा दर्जा दिला असून पशुधनाकडे जास्तीचे लक्ष देण्याचे कामं शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पशुधन वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून शासकीय योजनांचा लाभ घ्यायला पाहिजे असे मत मा.ग्रा.सदस्य गणेश बागल यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच इंटास कंपनीच्या वतीने या शिबिरा करता मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज बागल वस्ती गादेगांव येथे सरपंच प्रतिनिधी वृक्षमित्र दत्तात्रय बागल यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मा.ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल, हरी(काका) बागल, युवा नेतृत्व प्रथमेश बागल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कोळेकर, पशुधन पर्यवेक्षक डॉ.रमेश मोहिते, चेअरमन बंडू पाटील, इंटास कंपनीचे एरिया मॅनेजर विकास बागल, सागर रणदिवे, ऋषिकेश हाके, सुरज साळुंखे, दत्तात्रय बागल, तुषार काटकर आदी व पशुपालक उपस्थित होते.

