पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा व वैयक्तिक आरोग्य आणि व्यावसायिक विकास विषयावर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरा या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. भारतीय परंपरागत ज्ञान हे वेद, उपनिषद, इ. माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. याबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार असल्याने विविध कार्यशाळा शिक्षण मंत्रालयाकडून घेण्यात येतात. अशीच एक कार्यशाळा NICMAR विद्यापीठ पुणे, विश्व फौंडेशन अक्कलकोट, व उत्कर्ष माईंड्स टेक्नॉलॉजीज मुंबई व एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली होती.
या कार्यशाळेत विश्व फौंडेशन अक्कलकोट, व उत्कर्ष माईंड्स टेक्नॉलॉजीज मुंबई चे डॉ. श्रीकांत कल्लूरकर व NICMAR विद्यापीठ पुणे चे डॉ. आनंद प्रकाश यांनी उपस्थितांना भारतीय ज्ञान परंपरा व वैयक्तिक आरोग्य आणि व्यावसायिक विकास या बाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी उत्कर्ष माईंड्स टेक्नॉलॉजीज मुंबई, लेवल अप पुणे व एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या मध्ये समकालीन समस्या आणि सर्वांच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये उत्कृष्टता केंद्र (IKS) ची स्थापना बाबतचा सामंजस्य करार करण्यात आला, तसेच ENSIN उद्योजकता स्टार्टअप आणि इनोव्हेशन फोरम पुणे व एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यामध्ये उद्योजकता व नावीन्यपूर्ण संशोधनाबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व वगृती हवनाने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्रीकांत कल्लूरकर यांचा स्वागत सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते व डॉ. आनंद प्रकाश यांचा स्वागत सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यशाळेत पंढरपूरच्या सौ. मेघा दाते यांनी अग्निहोत्र व त्याचे आपल्या जीवनातील महत्व व आवश्यकता याबाबत उपस्थितांना माहिती दिली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

