मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी तर्फे आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत शिक्षक गटामध्ये श्रीमती तेजस्वी अनिल निवाते यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध जिल्ह्यांमधून निवड झालेल्या अनेक स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी ही बहुमानाची कामगिरी साध्य केली.
या स्पर्धेत समाजातील विविध घडामोडींवर आधारित विषय देण्यात आले होते. प्रभावी मांडणी, सुस्पष्ट उच्चारशैली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर श्रीमती निवाते यांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले व हा बहुमान मिळवत बक्षीस पटकावले. १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलुंड कालिदास नाट्य मंदिर येथे आयोजित पुरस्कार समारंभात सोसायटीचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांच्या सृजनशील योगदानाचे कौतुक करत " वकृत्वकला समाजामध्ये विचार प्रवर्तकता निर्माण करते तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग याला अधिक बळ देतो,”असे मत व्यक्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षिका तेजस्वी निवाते यांचे सहकारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे. या आधी देखील तेजस्वी निवाते यांना दोन वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे.एक विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांना अनेकजण ओळखतात.



