कराड प्रतिनिधी तेज न्यूज
कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी, दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड च्या ग्रीन क्लब तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्र, कोपर्डे येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामागील उद्देश समाजात स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे तसेच मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय ठेवणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांच्या आरतीने झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गाने परिसरातील कचरा गोळा करणे, झाडलोट करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करणे अशा विविध स्वच्छतेच्या कृती पार पाडल्या. काही विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छतेचे संदेश असलेले फलक लावून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडत संघभावना, शिस्त आणि सेवा भाव दर्शविला. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि आकर्षक दिसू लागला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक सल्लागार प्रा. के. एन. आळसुंदकर, प्रा. एस. एस. यादव आणि प्रा. पी. एच. कांबळे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना दृढ झाली.
या यशस्वी आयोजनात सोनाली जाधव, निखिल पाटील, प्रिती माळवदे, तसेच सर्व ग्रीन क्लब समन्वयकांचे योगदान उल्लेखनीय राहिले. शेवटी सर्वांनी एकमुखाने “स्वच्छता हीच खरी भक्ती” हा संदेश देत भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांना अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

