पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै. वसंतराव दादा काळे यांचे विश्वासू सहकारी आणि कारखान्याच्या सुरुवातीपासूनचे ज्येष्ठ संचालक, तसेच गादेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर नारायण फाटे (आप्पा) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्यात आणि सहकार क्षेत्रात एक निष्ठावान नेतृत्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश एकनाथ फाटे यांचे ते चुलते होते.
ज्ञानेश्वर आप्पा फाटे हे वसंतराव दादा काळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांनी कारखान्याच्या स्थापनेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांमध्ये आप्पांचा सक्रिय सहभाग होता.त्यांनी सदैव औदुंबर अण्णा पाटील गट आणि विठ्ठल परिवारासोबत एकनिष्ठ राहून सहकाराच्या चळवळीला बळ दिले.
फाटे आप्पा यांनी केवळ सहकारातच नव्हे, तर स्थानिक राजकारणातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी गादेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून काम केले.
त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे, कारखान्यात नोकरीच्या माध्यमातून गादेगावमधील अनेक बेरोजगार नवतरुणांना रोजगार मिळवून देण्याचे होते.
स्वर्गीय रामभाऊ बागल यांच्यानंतर, सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून गरजूंना मदत करणारा आणि नोकरी देणारा गादेगावमधील एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख होती.
सक्षम आर्थिक परिस्थितीतही संयम राखणारे आणि अडचणीच्या काळातही त्याच धैर्याने परिस्थितीला सामोरे जाणारे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. नेतृत्वाशी त्यांची निष्ठा आणि सामान्यांसाठी असलेला कळवळा हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता. देह रूपाने ते आपल्यातून गेले असले तरी, त्यांनी केलेले सार्वजनिक कार्य आणि सहकारातील योगदान नेहमीच स्मरणात राहील.

