फलटण प्रतिनिधी तेज न्यूज
फलटणच्या डॅाक्टर संपदा मुंडे यांच्या शोषणाची, आत्महत्येची (की हत्येची?) चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तपासावार देखरेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झालीय. सातपुते यांनी सोलापूर व सातारा येथे काम केलेय.
सातारा येथे दीड वर्षे कर्तव्य बजावून करोना महामारीत पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजेच पाच दिवसांत जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर उभा केलेल्या तेजस्वी सातपुते या ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या.
सोलापूर पोलीस अधीक्षक पदी असताना तेजस्वी सातपुते यांनी दारूभट्ट्यांवर काम करणाऱ्या परिवारासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम राबविले. बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या दारू भट्ट्यांवरील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. शिलाई मशीन, किराणा दुकान आदीमधून या दारूभट्ट्यावर काम करणाऱ्या पुरुष व महिलांना ऑपरेशन परिवर्तनला जोडण्यात आले होते .खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत लोकसभेत विषय मांडत तेजस्वी सातपुतेचे कौतुक केले होते.
सातपुते मॅडमनी जिल्ह्यातील वाळू माफियांचे कंबरडे मोडले होते. अनेक ठिकाणी बोटी, जेसीबी, टिपर आणि डंपर जप्त करण्यात आले होते. काही प्रसंगात तर संबंधित तालुक्याच्या त्या त्या तहसीलदारांनी नदीपात्रात धाडी घातल्या होत्या. त्यांच्यावर गाडी घालून चिरडण्याचे प्रयत्नही झाले. हे कोण करत होते हे सर्वांना ठाऊक आहे. परिणामी सातपुते यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या कामाची पद्धत अनेकांच्या डोळ्यात खुपू लागली. जे वाळू तस्करी करत होते, ज्यांचे जिल्हाभरात टोलनाक्यांची वसूली करत होते, ज्यांचे अवैध धंदे होते अशा अनेकांना सातपुते ह्या त्यांच्या मार्गातला काटा वाटू लागल्या.
योद्धा शरण येत नसतो तेव्हा त्याला बदनाम केले जाते, हा न्याय तेजस्वी सातपुते यांच्या बाबतीतही लागू पडला. बार्शी शहराचे तत्कालीन आमदार (जे भाजप पुरस्कृत अपक्ष होते) राजेंद्र राऊत यांनी मार्च 2022 मध्ये सोलापूर पोलिसांबाबत गंभीर आरोप करत राज्याच्या विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्या. सोलापूर जिल्ह्यात खुलेआम पणे अवैध धंदे सुरू आहेत, जिल्ह्यातुन एक ते दीड कोटींचा हफ्ता जातोय असा आरोप केला. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे, असेही त्यांनी म्हटले. अर्थातच हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, मात्र सातपुते यांची बदनामी केली गेली.
सोलापूर जिल्ह्यात गुटखा, वाळू तस्करी, मटका आदी खुलेआम सुरू आहे,अशा अर्थाची तक्रारही केली गेली. कोणत्याही शोध पत्रकाराने त्या दोन वर्षात सोलापूर एफडीएने किती गुटखा जप्त केला आणि त्या नंतरच्या दोन वर्षांत किती गुटखा जप्त केला याची अधिकृत तौलनिक आकडेवारी मांडली तर आरोप करणारे तोंडघशी पडतील. असो.
विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या विधानसभा सदस्यांनीच थेट लक्षवेधी सूचना मांडली होती. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी त्यास सहमती दर्शवली होती हे विशेष. पंढरपूर, मंगळवेढा येथे अवैध व्यवसाय, वाळू तस्करी पोलिस बंदोबस्तामध्ये कशी चालते त्याविषयी आमदार समाधान आवताडे यांनी मांडले होते. या दोन माजी नि आजी आमदारांची ख्याती संपूर्ण जिल्ह्याला, प्रशासनाला, पोलीस दलाला आणि पत्रकारांनाही ठाऊक आहे.
सातपुते यांनी दारुभट्टयावर धाड टाकून तिथे काम करणाऱ्या महिलांचे पुनवर्सन कसे नकली आहे हे सांगण्यासाठी काही सुपारीबाजांनी जीवाचा आणि प्रेसचा आटापिटा केला होता. अखेर सत्य पराजित झाले आणि तेजस्वी सातपुते यांची बदली झाली.
सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात हातभट्टीची किती दारू तयार होते आणि ती कुठे कुठे वितरित होते हे साऱ्या पोलिसांना आणि बहुतांश पत्रकारांना ठाऊक असते. ही काही फार मोठी बाब नाहीये. अधिकारी येतात आणि धाडी घालून जातात, आपल्या परीने चाप लावण्याचा प्रयत्न करतात.
सातपुते यांनी केवळ धाडी टाकल्या नव्हत्या तर हे काम करणाऱ्या महिलांना त्यापासून परावृत्त करत त्यांना रोजगाराची नवी साधने उपलब्ध करून दिली होती. ऑपरेशन परिवर्तन हे त्या मोहिमेचे नाव! यातून अनेक तांडे दारूनिर्मितीतून मुक्त झाले होते. कित्येक महिलांना नवे आयुष्य लाभले होते. मात्र आमच्या जिल्ह्याला चांगल्या अधिकाऱ्यांचे नेहमीच वावडे असल्याने त्यांची बदली झाली;
बदली सर्वांचीच होत असते, कधी न कधी होणारी ती एक प्रशासकीय बाब आहे मात्र बदनामी होऊन बदली केली जाऊ नये हा एक नैतिक संकेत असतो. किमान चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्या बाबतीत तरी असे घडू नये, अशाने चांगल्या माणसांची उमेद मरून जाते.
आता त्याच सातपुते यांची वर्णी या गंभीर प्रकरणी देखरेख करण्यासाठी शीर्षस्थानी लावलीय. आताही तेच फडणवीस मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत; सातपुते यांच्या विरोधातील लक्षवेधीपायी त्यांची बदली झाली होती. तेव्हाही तक्रारदार आरोपी बलाढ्य सत्ताधारी होते, आताचे आरोपी तर त्यांच्याहून पॉवरफुल नि सत्तेत वचक असणारे आहेत!
तेजस्वी सातपुते या कर्तबगार, तडफदार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत; आणि या प्रकरणाच्या दृष्टीने त्याहून महत्वाची बाब म्हणजे त्या एक अत्यंत संवेदनशील महिला आहेत.
त्यांच्यावर कोणतेही दडपण आणले नाही, कोणताही दबाव टाकला नाही तर त्या नक्कीच सत्य समोर आणतील. आणि त्यांना कामाचे स्वातंत्र्य आणि मुभा दिली गेली नाही तर पुन्हा एकदा त्यांना बळीचा बकरा बनवला जाईल असे वाटणे साहजिक आहे!
- समीर गायकवाड


