राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारयादी सुधारित कार्यक्रम जाहीर
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सोलापूर महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम-२०२५ जाहीर केला आहे. या अंतर्गत 14 नोव्हेंबरला प्रारूप तर 6 डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार खालीलप्रमाणे सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरीता प्रसिद्ध करण्यासाठी दि.14 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केली आहे.
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम मुदत दि. 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहणार आहे.प्रारूप मतदार यादीवरून दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख 6 डिसेंबर 2025 तर मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 8 डिसेंबर 2025 आहे. मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख 12 डिसेंबर 2025 आहे. याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

