मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
दिवाळी बोनसकडे लक्ष लागून असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून दिवाळीआधीच ६ हजार रूपयांचा दिवाळी बोनस खात्यात जमा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अधिकच्या बोनसची अपेक्षा होती. मात्र ६ हजारांच्या बोनसने 'कही खुशी कही गम' अशा संमिश्र भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, प्रसंगी संपावर जाण्याची भूमिका घेतली होती. आझाद मैदानावर समितीचे धरणे आंदोलनही आजपासून सुरू झाले होते. याच पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटना कृती समिती, मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य ?
१२५०० रूपये सण उचल
-सरासरी ७५०० वेतनवाढ फरक हप्ता (प्रति महिना)
-६००० रुपये दिवाळी भेट रक्कम
एसटी कर्मचाऱ्यांच्या बाकी मागण्या प्रलंबित आहेत. सध्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसल्याने लगोलग मागण्या मान्य करण्यास अडचणी येत आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट करीत दिवाळी सणाआधी बाकी मागण्यांवर तोडगा काढण्याची तयारी दाखवली.एसटी कर्मचाऱ्यांना २०१८ पासून महागाई भत्ता देण्यात आलेला नाही. तसेच २०२० ते २०२४ या काळातील वेतनवाढीतील फरकही देण्यात आलेला नाहीत. हे दोन्हीही प्रलंबित देयके देण्यात यावीत, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती. शिवाय दिवाळी बोनस आणि दिवाळी उचल अशाही मागण्या होत्या.