पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड हायब्रीड व्हेईकल्स या विषयाच्या अभ्यासक्रमाअंतर्गत माने मोटर्स ई-व्हेईकल्स, पखालपूर येथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती.
या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांच्या टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरले जाणारे विविध घटक जसे की मोटर, कंट्रोलर, कन्व्हर्टर, बॅटरी आणि चार्जिंग सिस्टीम्स यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. त्यांनी उत्पादन व चाचणी प्रक्रियेचा सखोल अभ्यास करत उद्योगातील तांत्रिक मानके आणि प्रमाणपत्र प्रक्रिया समजून घेतली.
या भेटीदरम्यान कंपनीचे डायरेक्टर रवी माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ई-व्हेईकल उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, बाजारातील संधी, तसेच टिकाऊ ऊर्जेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंका विचारून ज्ञानवृद्धी केली. या भेटीत ६० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या औद्योगिक भेटीचे समन्वयन व मार्गदर्शन प्रा. विनोद पी. मोरे, प्रा. दत्तात्रय एम. कोरके आणि प्रा. सोनाली डी. घोडके यांनी केले. विभागप्रमुखांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा भेटींमुळे उद्योगाभिमुखता, व्यावहारिक दृष्टिकोन आणि तांत्रिक कौशल्य वाढीस लागते असे सांगितले.
विद्युत अभियांत्रिकी विभाग नेहमीच अशा शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातील अभियांत्रिकी प्रक्रियांशी जोडून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध आहे.

