पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, पी. पी. पेठकर यांच्या सहकार्याने पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व अधिवक्ता संघ, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० नवजीवन निवासी अपंग शाळा, के.बी.पी. कॉलेज चौक, बायपास रोड, पंढरपूर येथे दिव्यांग बालकांसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश. ए. एस. सलगर यांनी दिली.
या विशेष शिबीरामध्ये तालुक्यातील दिव्यांग बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिपक धोत्रे यांचे मार्गदर्शनाखाली तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बालकांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याबाबत माहिती देण्यात येणार आहे. दिव्यांग बालकांसाठी असणाऱ्या योजनांचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी शिबीराच्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तालुक्यातील दिव्यांग बालक यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह नवजीवन निवासी अपंग शाळा, के.बी.पी. कॉलेज चौक, बायपास रोड, पंढरपूर येथे उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ए. एस. सलगर यांनी केले आहे.