मुंबई प्रतिनिधी वैभव पाटील
जॉय ऑफ गिव्हींगच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी नेरे (पनवेल) येथील शांतीवनमधील कुष्ठरोग निवारण समितीच्या कै. चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
वाशी येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळ, नेरुळ येथील जेष्ठ नागरिक संघ आणि नेरुळ युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीवनमधील कुष्ठरुणांना दिवाळीनिमित्त गोड पदार्थांचे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप उपक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
यावेळी पार पडलेल्या सर्वांगसुंदर कार्यक्रमात विचारमंचावर कुष्ठरोग निवारण समितीचे चेअरमन ऍड प्रमोद ठाकूर, १६३ वेळा रक्तदान करणारे, मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलेले, ३०० पेक्षा अधिक रक्तदान शिबीरे आयोजित करणारे तसेच चार पेक्षा जास्त व्याख्याने देणारे, बुलढाणा खामगाव येथे जन्मलेले पनवेलचे सिनिअर सर्जन डॉ अरुण रानडे, पत्रकार व दै नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, जॉय विशेषांकाचे संपादक वैभव पाटील, कार्यकारी संपादक गणेश हिरवे, माजी सैनिक तसेच जॉय सभासद चंद्रशेखर सावंत तसेच तिन्ही आयोजक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र घरत लिखित ब्रेल लिपीतील पुस्तकाचेदेखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि सुटसुटीत सूत्रसंचालन युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख यांनी केले. जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले असून अनेक नामवंत लेखक, कवींचे साहित्य त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. अंकातील सर्वच लेख, कथा, कविता वाचनीय असून त्या माध्यमातून वाचकांना दिवाळीचा वाचनीय फराळ उपलब्ध करण्यात आलेला आहे व जॉयचा हा पहिला अंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा विशेषांकाचे कार्यकारी संपादक आणि जॉय संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी व्यक्त केली.
जॉयचा हा पहिलाच दिवाळी विशेषांक वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आणि उत्तम कौटुंबिक साहित्याची मेजवानी ह्या अंकाच्या माध्यमातून त्यांना मिळेल याची खात्री असल्याचे संपादक वैभव पाटील यांनी सांगितले. अंक मिळवण्यासाठी गणेश हिरवे (९९२०५८१८७८) किंवा वैभव पाटील (९८१९११२८८५) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.