पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शुक्रवार, दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (पंढरपूर) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत माढा तालुक्यातील दारफळ या पूरग्रस्त गावामध्ये सामाजिक बांधिलकी जपत, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी परिपूर्ण अशा २०० मदत किट्सचे वितरण करण्यात आले.
सीना नदीच्या पूरामध्ये बाधित झालेल्या दारफळ गावातील कुटुंबांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी एकत्रितपणे हा उपक्रम उचलून धरला. या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी केले असून, स्थापत्य विभागाचे प्रा. अमोल कांबळे यांनी विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष गावात जाऊन पूरग्रस्त कुटुंबांना किट्सचे वितरण केले.
या मदत किटमध्ये अन्नधान्य, शालेय साहित्य, स्वच्छता सामग्री, आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. या उपक्रमाबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की , "विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन केलेली ही सेवा कार्य म्हणजे त्यांच्या चारित्र्याचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे."
कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कुराडे, सत्यम कापले, नाना वाघमारे, अविराज साळुंखे, प्रवीण नागटिळक, काकासो पवार, राज नागणे, संकेत खडतरे, वैभव व्यवहारे, विनायक कुंभार, ओंकार गायकवाड, वैष्णवी देवकर, रेश्मा पठाण आणि इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून महाविद्यालयाने घेतलेला हा पुढाकार इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

