राजकीय शहाणपण कोणी कोणाला शिकवायचे...?
राजकारण ही केवळ सत्तेची खेळी नाही, तर ती समाज घडवण्याची, विचार रुजवण्याची आणि जनतेचा विश्वास जपण्याची जबाबदारी असते. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. परंतु आजचा प्रश्न आहे राजकीय शहाणपण कोणी कोणाला शिकवायचे ? कारण, महाराष्ट्रात सध्या जे काही राजकीय वातावरण आहे ते पाहता, शहाणपण शिकवण्याची स्पर्धाच सुरू आहे. पण खरी शहाणपण... शिकवून येत नाही, ती अनुभवातून, लोकांशी जोडून आणि *तत्त्वांशी निष्ठा ठेवून निर्माण होते.*
महाराष्ट्र हे देशातील विचारप्रधान राजकारणाचं केंद्र राहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, स्वराज्य आणि लोकसहभाग या तत्त्वांवर राज्यकारभार उभा केला. त्यानंतर शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, आर.आर.आबा व भाई गणपतराव देशमुख आबा या साऱ्यांनी राजकारणाला माणुसकीचं भान दिलं. म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर विचारासाठी लढणारं होतं.परंतु काळाच्या ओघात या राजकीय संस्कृतीत बदल झाले. *जनआंदोलनं थंडावली,पक्षीय निष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठा वाढली, आणि तत्त्वांपेक्षा तडजोड महत्त्वाची ठरली.* इथेच राजकीय शहाणपणाचा तोल डळमळू लागला.
आंदोलनाला जातीची किनार आली.
लोकांच्या भावनांची जाण ठेवणं, निर्णयाच्या वेळेला विवेक वापरणं,सत्तेचा वापर सेवेसाठी करणं, आणि विरोधकांबद्दलही मर्यादा राखणं. हे शहाणपण पुस्तकातून नाही, तर जनतेच्या नाडीला ओळखून येतं. *आज मात्र काहीजणांना वाटतं की सत्तेची चावी म्हणजेच शहाणपण. पण ती चावी केवळ काळापुरती दारं उघडते... लोकांच्या मनातली दारं उघडण्यासाठी संस्कार आणि संयम लागतो. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात राजकीय नकाशे वारंवार बदलताना दिसले. मित्रपक्ष शत्रू झाले, शत्रू मित्र झाले. सिद्धांत हा शब्द घोषणांमध्ये राहिला, आणि गणित हे वास्तव बनलं.* या सगळ्यात जनतेने एक प्रश्न विचारायला सुरुवात केलाय... राजकीय शहाणपण कुणाकडे आहे खरं ?
सत्ता बदलते, पण समाजाच्या समस्यांकडे तितकं लक्ष जात नाही. शेतकरी आत्महत्या, तरुणांची बेरोजगारी, शिक्षणातील अन्याय, आणि गावागावात वाढतं राजकीय ध्रुवीकरण... ही आजची खरी आव्हानं आहेत. खरं राजकीय शहाणपण म्हणजे या प्रश्नांकडे निर्भीड नजरेने पाहून, उपाय शोधण्याची ताकद दाखवणं. परंतु आज अनेकदा उपायापेक्षा आरोप मोठे, आणि *जबाबदारीपेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची बनली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्य नव्हे, विचार एकवटले. वसंतराव नाईक यांनी प्रशासनातील स्थैर्याला महत्त्व दिलं. आर.आर. पाटील यांनी सत्तेत राहूनही साधेपणा जपला. भाई गणपतराव देशमुख यांनी मतदारसंघाशी नातं हे सेवेचं ठेवलं, सत्तेचं नाही.* ही सगळी उदाहरणं दाखवतात की राजकीय शहाणपण म्हणजे केवळ हुशारी नाही... ते प्रामाणिकपणात, शांततेत आणि धैर्यात दडलेली असते. आज सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण विश्लेषक बनला आहे.एखादी घोषणा, भाषण, किंवा निर्णय तात्काळ चर्चेत येतो. पण राजकीय शहाणपण म्हणजे गोंगाट नव्हे...ती अंतर्मुखता आहे. *काय बोलायचं पेक्षा कधी गप्प राहायचं हे ओळखणं महत्त्वाचं.*
सध्याचं राजकारण मात्र त्वरित परिणामांच्या मोहात अडकलेलं आहे. फोटो, व्हिडिओ, आणि फेक प्रसिद्धी यांच्या गर्दीत शांत विवेक मागे पडला आहे. अशा वेळी महाराष्ट्राला पुन्हा त्या विचारशील राजकारणाची गरज आहे जिथे लोकांशी संवाद हा फक्त मतांसाठी नव्हे, तर विश्वासासाठी असेल. राजकीय शहाणपणाचं सार एकच भिन्नमताला मान देणं. आज मतभेद शत्रुत्वात बदललेत. परंतु महाराष्ट्राची माती ही संवादाची आहे.
संत परंपरेपासूनच आपल्याकडे मतभिन्नता असूनही एकता टिकवण्याची ताकद होती.हीच परंपरा आजच्या राजकारणात जपणं म्हणजे खरं शहाणपण. आजच्या तरुण पिढीकडे विचार आहेत, तंत्रज्ञान आहे, आणि बदल घडवण्याची शक्ती आहे. पण तिला दिशादर्शन हवंय ज्यातून राजकारण नव्हे, तर सेवा शिकेल. राजकीय शहाणपण हे शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवता येत नाही, पण समाजसेवेच्या अनुभवातून नक्की उमजतं. म्हणूनच राजकारणात प्रवेश करणाऱ्या नव्या पिढीने सत्तेचा मोह नव्हे, तर समाजाचा आवाज ऐकायला शिकायला हवा.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्या राजकीय शहाणपणाची गरज आहे..जे घोषणांपेक्षा कृतीत दिसेल,जे सत्तेपेक्षा समाजाला अग्रक्रम देईल,आणि जे मी पेक्षा आपण या विचारावर उभं राहील.राजकीय शहाणपण कोणी कोणाला शिकवायचं नसतं.ते महाराष्ट्राच्या मातीमध्ये, संतांच्या शब्दांमध्ये, आणि जनतेच्या अनुभवात आधीपासूनच आहे.फक्त ते पुन्हा ऐकायचं, समजायचं, आणि आचरणात आणायचं.सत्ता ही तात्पुरती असते, पण शहाणपण ही परंपरा असते..आणि महाराष्ट्र त्या परंपरेचं जिवंत उदाहरण आहे.
काल परवा एकमेकांवर तुटून पडणारे एकमेकांना गोंजारत असताना... एकमेकांना गोंजारत असणारे एकमेकांवर तुटून पडलेले पाहून.... जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो... राजकीय शहाणपण कोणी कोणाला शिकवायचे...? निष्ठा व पक्ष सिध्दांत सध्या गटांगळ्या खात आहेत... त्यांना वाचवणारे हात कुठे गेले...?
प्रा.आनंदा आलदर ✒️

