मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . यामध्ये मका, सूर्यफूल, बाजरी, टोमॅटो, मिरची, कांदा, भुईमुग, उडीद, दोडका डाळिंब पेरू या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता त्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 88 हजार 505 शेतकऱ्यांच्या खात्यावर 84 कोटी 45 लाख रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असून दिवाळीपूर्वी सर्व नुकसानभरपाई खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
यंदाच्या खरिपामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते या संकटाशी सामना करण्याचे बळ देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन परिस्थिती जाणून घेत मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना देत आपल्या कार्यालयातील स्वीयसहाय्यकांचे संपर्क क्रमांक शेतकऱ्यांसाठी खुले करत पंचनामासाठी अधिकाऱ्यांनी अडचण आणली तर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते मंगळवेढा तालुक्यातील बोराळे व मारापुर मंडल मध्ये पर्जन्यमापक यंत्रात बिघाड झाल्यामुळे तेथील पाऊस कमी दाखवल्याने या मंडल चा नुकसान भरपाई मध्ये समावेश होण्याच्या अशा धूसर झाल्या होत्या.
मात्र संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून पर्जन्यमापकाच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत आकडेवारी मध्ये सुधारणा करून मारापूर व बोराळे मंडलचाही या नुकसानीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी समावेश करत तेथील शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे, घरांच्या झालेल्या नुकसानीमुळे सर्व ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले होते अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अधिकारी पंचनामे करत होते अद्याप काही ठिकाणचे पंचनामे सुरूच आहेत अनेक विहिरीची पडझड झाली आहे त्यांनाही मदत मिळणार असून त्याची प्रक्रिया पंचायत समितीकडे देण्यात आलेली आहे.
पंढरपूर तालुक्यात 28 हजार 775 बाधित शेतकरी असून त्यांना 26 कोटी 45 लाख रुपये मदत जाहीर झाली असून मंगळवेढा तालुक्यातील 59 हजार 730 शेतकऱ्यांना 58 कोटी रुपये मंजूर झाले असून आजपासून हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी रात्रंदिवस अधिकाऱ्यांना कामाला लावले त्यामुळेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होईल याचे समाधान वाटते असे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.