पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये Neural Talk : Future with AI" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अमेय उत्पात यांची उपस्थिती लाभली. विभागप्रमुख डॉ. ए. ओ. मुलाणी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यानंतर श्री. उत्पात यांच्या सखोल व माहितीपूर्ण व्याख्यानास सुरुवात झाली.
श्री. अमेय उत्पात यांना उद्योगक्षेत्रात सात वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी Nokia, Accenture, Concentrix Catalyst या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या सादरीकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यामध्ये AI मॉडेल्सची रचना प्रक्रिया, AI मॉड्युल डिझाईन, इंजिनीअरची भूमिका, नैतिक मूल्ये तसेच Prompt Engineering याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यासोबतच, त्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, आत्मविश्वास, आणि सतत नविन गोष्टी शिकण्याचे महत्त्व याविषयीही प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ज्ञान व उद्योग क्षेत्रातील व्यवहार्य दृष्टीकोन यामधील दुवा निर्माण करणारे ठरले. विभागप्रमुख डॉ. ए. ओ. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. वैष्णवी उत्पात यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

