पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरात सुरू असलेल्या फ्लायओव्हर प्रकल्पातील फौंडेशनसाठीच्या पाईल्सच्या बांधकाम साईटला नुकतीच शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पाईल्सच्या बांधकामासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मशिनरी प्रत्यक्ष पाहता आली. तसेच पाईल्सचे रीइन्फोर्समेंट (सळई) आणि काँक्रीटींग प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक बांधकाम प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, “अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांचे सैद्धांतिक ज्ञान अधिक दृढ होते. शिवाय, त्यांना प्रत्यक्ष आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाची ओळख होते, जे त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.”
विद्यार्थ्यांनी या भेटीचा मनापासून आनंद घेतला असून, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्यक्ष तांत्रिक प्रक्रियांबाबत अनुभव मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

