पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने बी. एम. आय. टी., सोलापूर येथील प्रा. अविनाश लावणीस यांचे व्याख्यान व एक दिवसीय कार्यशाळा दिनांक १३/०९/२०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमाबाबत माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. व्याख्यान आणि कार्यशाळेदरम्यान श्री. अविनाश लावणीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उद्योजकतेविषयी आणि नावीन्यपूर्ण विचारसरणीविषयी प्रबोधन केले.कार्यक्रमाची रचना दोन स्वतंत्र सत्रांमध्ये करण्यात आली होती.
सकाळच्या सत्रामध्ये- “समस्यांवरील उपाय शोधणे आणि नवकल्पनांची कार्यशाळा” या विषयावर प्रा. लावणीस यांनी सखोल मार्गदर्शन केले. नवकल्पना निर्माण करण्यासाठी लागणारी पद्धत, विचारप्रक्रिया आणि समस्यांचे विश्लेषण करून उपाययोजना करण्याची कला विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
दुपारच्या सत्रामध्ये- “बौद्धिक संपदा हक्कांची मूलतत्त्वे आणि नवोपक्रम करणाऱ्यांसाठी व उद्योजकांसाठी त्याचे महत्व” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. बौद्धिक संपदा हक्क (IPR) म्हणजे काय, त्याचे स्टार्टअप्स व उद्योजकांसाठी महत्त्व, पेटंट प्रक्रियेचे टप्पे इत्यादी मुद्द्यांवर विश्लेषणात्मक माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन IIC सेल व EDC सेल यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन व स्टार्टअप्सविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातील करिअरसाठी उपयोगी ठरणारे महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून मिळाली.कार्यक्रमाची सांगता डॉ. अतुल आराध्ये यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

