पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या योगासन कलेचा ठसा उमटवत घवघवीत यश संपादन केलेले आहे.
येथे झालेल्या जिल्हास्तरीय कलात्मक योगासन जोडी स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींमध्ये सिद्धी सावंत व दिक्षा जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून, पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्या पात्र ठरल्या आहेत. दुसरीकडे १७ वर्षाखालील मुलींच्या गटात ईश्वरी गाडवे व वाणिश्री घाडगे यांनी द्वितीय क्रमांक, तर १४ वर्षाखालील मुलींमध्ये स्वस्ति मालवदकर व ज्ञानेश्वरी वानवे यांनी देखील या कलात्मक योगासन जोडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षिका पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विश्वशांती गुरुकुल स्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी निरोगी आयुष्यासाठी योगासनाचे महत्त्व अधोरेखित केले. एमआयटी संस्थेच्या वतीने सर्व पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

