पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे इंजिनिअर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी “क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंग” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हा उपक्रम यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (MESA) अंतर्गत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन सोहळ्याने झाली. त्यानंतर विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला आणि त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री. अविनाश लावणीस सत्राचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तिचे अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्व आणि “थिंक आउट ऑफ द बॉक्स” कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. वास्तवातील उदाहरणे आणि केस स्टडीज वापरून त्यांनी विद्यार्थ्यांना डिझाईन थिंकिंगच्या पद्धती आणि त्याचे समाजोपयोगी व अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुप्रयोग समजावून सांगितले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व तज्ज्ञांशी संवाद साधला. यातून त्यांना समस्या सोडवण्याचे नवे दृष्टिकोन, नवनिर्मितीची प्रेरणा आणि टीमवर्कचे महत्त्व यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
कार्यक्रमाच्या शेवटी MESA चे समन्वयक प्रा. एच. एस. देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी पाहुण्यांच्या मौलिक मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
इंजिनिअर्स डे निमित्त आयोजित ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता आत्मसात करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरली. या उपक्रमाने केवळ अभियांत्रिकी क्षेत्राच्या योगदानाचा गौरव केला नाही, तर विद्यार्थ्यांना नवीन विचार व दिशा दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

