पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोटर्स व कंट्रोलर्स या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याबाबत माहिती विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना ई-मोबिलिटी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची सैद्धांतिक व प्रात्यक्षिक माहिती देणे असा होता. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन सोहळ्याने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या श्री. शंकर वडने (शिक्षणतज्ञ व ई-वाहन विशेषज्ञ) यांचा विभागप्रमुख डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एस. आर. कोळी यांनी अतिथींचा परिचय करून देताना त्यांच्या ई-व्हेईकल्स क्षेत्रातील कार्याची माहिती दिली.
मुख्य सत्रात श्री. शंकर वडने यांनी विद्यार्थ्यांना मोटर्स व कंट्रोलर्सचे प्रकार, कार्यपद्धती, उपयोग व निवड निकष याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः सुरक्षितता, कार्यक्षमता व खर्च या दृष्टिकोनातून योग्य निवड कशी करावी यावर त्यांनी भर दिला. यासोबतच, ई-वाहन उद्योगातील वाढ, तांत्रिक प्रगती व भविष्यातील संधी याविषयीही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती. पखालपूर येथील माने मोटर्स, पंढरपूर येथे ही भेट घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मोटर्स, कंट्रोलर्स आणि प्रगत बॅटरी तंत्रज्ञान, EV मोटर्सच्या रिअल-टाईम ऑपरेशन्सचे निरिक्षण केले, उत्पादन प्रक्रिया पाहिली आणि त्यांनी माने मोटर्सद्वारे विकसित केलेले नवकल्पनायुक्त ई-वाहन डिझाइन्स व प्रोटोटाइप्स प्रत्यक्ष पाहिले.
ही कार्यशाळा आणि औद्यागिक भेटीमुळे विद्यार्थ्यांचा EV क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञानात भर पडली असून भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्राात करिअर करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे.
कार्यशाळेचे नियोजन प्रा. आर. के. शिंदे आणि डॉ. एस.आर.कोळी यांनी केले, तर सूत्रसंचालन पृथ्वीराज पी. गुरव यांनी केले. तसेच त्यांनी प्रमुख अतिथी, माने मोटर्सचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

