पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग यांच्या वतीने ॲडव्हान्सड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट टेक्निक या विषयावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या सेमिनारसाठी शिवश्री इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स, पंढरपूर चे मालक इंजिनीयर कुलभूषण गोडसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील आधुनिक व्यवस्थापन पद्धती, प्रकल्प व्यवस्थापनातील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वेळ, खर्च आणि गुणवत्ता नियंत्रण कसे प्रभावीपणे करता येते, याची त्यांनी प्रात्यक्षिक उदाहरणांसह माहिती दिली.
या कार्यक्रमादरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि शिवश्री इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांच्यात सामंजस्य करार (MoU) पार पडला. या करारामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रकल्प अनुभव आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सेमिनारच्या उद्देशाविषयी विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची प्रकल्प व्यवस्थापनाविषयी व्यावहारिक समज वाढेल. तर उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात असे उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून, रोजगार संधींमध्ये वाढ करतात, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेमिनारच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांनी बांधकाम प्रकल्पातील नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता दर्शवत प्रश्न विचारले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेसा प्रेसिडेंट पूजा घायाळ यांनी केले, तर प्रा. मिलिंद तोंडसे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

