पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्याच्या वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या 'पुणे शहर कार्यकारिणीच्या ५० व्या मासिक आढावा बैठकी'स हजर राहिलो. सोबतच, यानिमित्तानं आयोजित 'भव्य कार्यकर्ता मेळाव्या'त मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी सुसंवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत पाटील- जगताप, जिल्ह्याचे आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रीय महासचिव जयदेवराव गायकवाड, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, अशोक पवार, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के, पंडित कांबळे, महिला आघाडीच्या प्रमुख स्वातीताई पोकळे, युवक, विद्यार्थी व अल्पसंख्यांक या सगळ्या संघटनांचे प्रमुख आणि उपस्थित बंधू भगिनीं उपस्थित होते.
यावेळी शरदचंद्र पवार म्हणाले की,मला सांगण्यात आलं की, आज कार्यकारिणीची बैठक आहे. पण मला असं दिसतंय की, वार्षिक सर्वसाधारण सभा! कारण साधारणतः कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये २०-२५-३० लोक असतात. पण पुणे शहराचं चित्र बदलतंय, तुमच्या बाजूने अनुकूल होतंय. याची प्रचिती आली ही उपस्थिती या ठिकाणी दाखवते. असे मत राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
पुढे पवार म्हणाले की निवडणुका आल्यात. सुप्रीम कोर्टाने आता स्वच्छ भूमिका घेतली की, एका ठराविक काळामध्ये 'स्थानिक स्वराज्य संस्था' यांच्या निवडणुका घेतल्याच पाहिजेत. त्यामुळे साहजिकच सबंध राज्यामध्ये 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' त्याचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आणि मला जागरूक राहावं लागेल. तयारी करावी लागेल, निर्णय घ्यावे लागतील. आपण गांधी- नेहरूंचा विचार मानतो. निवडणुका उद्या होतील, त्यावेळेला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' म्हणून आपण मतदारांच्यापुढं जाणार आहोत. इतरही काही पक्ष आहेत. काही पक्ष देश पातळीवर आम्हाला सहकार्य करतात. काही पक्ष राज्यामध्ये सहकार्य करतात. काही पक्ष स्वतंत्रपणानं निवडणूक लढण्याचा विचार करतात. यासंबंधीचा निकाल पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे लवकरच घेतील. अन्य मित्र पक्ष यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्याबरोबर जायचं की नाही? गेलो तर कार्यक्रम काय? किती जागा मिळतील? कोणत्या त्या असतील? या सगळ्यांचा निर्णय आपले अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे तुम्हा लोकांच्या विश्वासाने निर्णय घेतील आणि त्याने आपण निवडणुकीला सामोरे जाऊया.
आपण 'काँग्रेस'च्या नावाने लढतो, राष्ट्रवादी काँग्रेस! पण 'राष्ट्रवादी काँग्रेस' याच्यामागं विचारधारा आहे. मी सुरुवातीला सांगितलं ती विचारधारा गांधी- नेहरू- आझाद यांची विचारधारा आहे. ही विचारधारा मजबूत करायची आहे. विशेषतः पुणे शहरामध्ये आपण इथे एकत्रित आहोत. माझ्या मते, पुणे शहराच्या 'काँग्रेस' विचारांच्या लोकांची जबाबदारी ही अधिक आहे. त्याचं कारण कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. १८८५ साली 'काँग्रेस पक्ष' स्थापन झाला. त्याचा निर्णय पुण्यामध्ये झाला. 'काँग्रेस पक्षा'ची स्थापना, जन्म हा पुण्यात झाला. बैठक बोलावली होती. पण दुर्दैवानं बैठक ज्या दिवशी बोलावली होती, त्याच्या आधी तीन दिवस पुण्यामध्ये प्लेगची साथ होती. ही प्लेगची साथ आल्यामुळं इथं कुठलेही कार्यक्रम हे घेता आले नाहीत. म्हणून पुण्याचा निर्णय हा बदलला आणि तो मुंबईला नेला. आज ज्याला 'ऑगस्ट क्रांती मैदान' हे जे ठिकाण आहे, तिथे 'काँग्रेस' नेली आणि तिथून 'काँग्रेस' ही जाहीर केली गेली. पण त्याचं मूळ हे पुण्यातलं होतं आणि पुण्यातलं असेल तर 'पुणेकर' म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी ही अधिक आहे. असे पवार यांनी सांगितले.
आजचं पुणं आणि १९८५ चा जो पुणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज पुणं शहर बदललेलं आहे. तुम्ही सगळेजण पुण्यामध्ये राहता. आज रस्त्याने जाणं अवघड आहे, दळणवळणाची साधनं वाढली. देशामध्ये सगळ्यात जास्त 'टू व्हीलर्स' यासंबंधीची नोंद ही पुण्याची आहे. अनेक गोष्टी आहेत, आज जुनं पुणं राहिलेलं नाही. एक काळ असा होता की, छोटी- छोटी घरं! आज लोक सांगतात तिथं ३० मजल्यांची इमारत, कुठे ४० मजल्यांची इमारत आणि यामुळे आज पुण्याचा चेहरा बदलला आहे. पण या सगळ्या बदलाच्या वेळेला त्याच्या गरजाही काही आहेत. उदाहरणार्थ ४० मजली इमारत बांधली. ज्या जागेवर ५ लोक राहणार होते, आज त्या ठिकाणी ३००- ४०० लोक हे राहायला येतात. मग प्रश्न येतो, पाण्याची सोय आहे का? रस्त्याची सोय आहे का? पुरेसा वीज आहे का? आरोग्याच्या सुविधा आहेत का? कायदा आणि सुव्यवस्था याची व्यवस्था आहे का? प्रचंड नागरी प्रश्न आज पुण्यासारख्या शहरात आणि आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. याला उत्तर शोधायचं असेल तर, महानगर पालिका! उद्या पुण्याच्या भवितव्यासाठी मार्ग काढणारी ही महानगर पालिका झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रश्नांच्या संबंधी आस्था असलेले उमेदवार हे निवडून आले पाहिजेत. ती दृष्टी आज तुम्हा लोकांच्यामध्ये आहे.
प्रशांत जगताप स्वतः महापौर होते. अंकुश काकडे स्वतः महापौर होते. कमलताई होत्या, अनेकांची नावं सांगता येतील. आपल्यामध्ये महानगर पालिकेच्या कामांचा अनुभव असलेले अनेक सहकारी आहेत. त्यामुळे साहजिकच आपली नैतिक जबाबदारी पुण्याच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद आणि दृष्टी आज तुमच्यामध्ये असेल तर, ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्या जबाबदारीमध्ये यश मिळवायचं असेल तर, महानगरपालिकेला उत्तम उमेदवारांची निवड! नव्या पिढीच्या तरुण उमेदवारांना संधी देऊन त्यांची निवड करणं आणि लोकांचा विश्वास संपादून महानगर पालिका इथलं सूत्र तुम्हा लोकांच्या हातात येईल, तुमच्या सहकाऱ्यांच्या हातात येईल, याची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. माझी खात्री आहे की, लोकांनी एकदा साथ दिली की आपण पूर्ण ताकदीने पुण्याचे नागरी प्रश्न जे आहेत, त्याच्या सोडवणुकीसाठी जे जे करावे लागेल ते आपण करू. त्या दृष्टीने आजची ही बैठक एक विचार घेऊन जायचं आहे, निर्धार घेऊन जायचा आहे. उद्याची महानगर पालिका नागरी प्रश्नांची सोडवणूक असण्याची कुवत ज्या 'राष्ट्रवादी काँग्रेस'मध्ये आहे, त्यांच्याच हातात आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्नांची पराकष्टा करू, हाच निकाल घेऊन तुम्ही इथनं गेलं पाहिजे.
उद्या पक्ष कुणाशी युती करायची? यासंबंधीचा निकाल हा घेईल. त्या निकालाच्या नंतर सगळ्या जागा या आपल्याकडे काय येणार नाहीत. काही जागा मित्रांना सोडाव्या लागतील. ज्या जागा आपण लढवू, तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीच्या आणि नक्कीच जिंकू शकेल, अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व करेल. त्यांना साथ देणं, सहकार्य करणं ही तुम्हा लोकांची जबाबदारी आहे. त्याची पूर्तता तुम्ही कराल, हा विश्वास या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला या कामाला शुभेच्छा देतो. असे पवार म्हणाले.

