पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रात्री 11:30 वाजता शिंपी समाजाचे आधारवड, शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रतिशिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. जनसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ठामपणे उभे राहणारे आणि समाजकार्याला आपले आयुष्य समर्पित करणारे हे थोर व्यक्तिमत्त्व आता आपल्या सोबत नाही, ही अतोनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
1996 साली विधान परिषदेवर निवडून जाऊन त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेचा ठसा उमटविला. पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची ओळख केवळ पक्षनिष्ठ नेत्याची नव्हे तर समाजाशी घट्ट नाळ जुळलेल्या जनतेच्या नेत्याची होती. शिरगाव शिर्डी येथे त्यांनी उभारलेली साईबाबांची प्रतिशिर्डी, अन्नछत्र, आदिवासी मुलांसाठी शाळा आणि विविध समाजोपयोगी उपक्रम आज त्यांच्या कार्याचा जिवंत पुरावा आहेत.
विशेष म्हणजे शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी, एकतेसाठी आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. शिंपी समाजाच्या अनेक उपक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला, नवी ऊर्जा दिली आणि समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचे काम आयुष्यभर केले. त्यांच्या जाण्याने शिंपी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या निधनाने शेवटी समाज परिवारासह संपूर्ण बहुजन समाजाला मोठी हानी झाली आहे. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे नेतृत्व आणि त्यांची कार्यतत्परता कायम स्मरणात राहील. देवळे साहेबांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि त्यांचा समाजाभिमुख वारसा आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र सर्व पदाधिकारी सदस्य व समाजबांधव यांनी सांगितले आहे.

