पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील कु. सुमित्रा सांगोलकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी करत एकाच वेळी दोन सुवर्णपदक पटकावले. या दुहेरी गौरवाने संपूर्ण महाविद्यालयाचा आणि विभागाचा सन्मान उंचावला असून ती विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे.
कु. सुमित्राने बी.ई. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सर्व शाखांमधून सर्वोच्च गुण मिळवून प्रथम सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर व डिझाईन ऑफ काँक्रीट स्ट्रक्चर्स १ व २ या अत्यंत कठीण विषयांतही सर्वोच्च गुण मिळवून तिने दुसरे सुवर्णपदकही कमावले. या पारितोषिकामुळे कु. सुमित्राचा पराक्रम सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच उजळणार आहे.
या गौरवशाली सुवर्णपदकांचे वितरण सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रकाश महानवर, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि विद्यापीठाच्या इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाने संपूर्ण शैक्षणिक मंडळी आणि विद्यार्थीवृंदात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे (डीन आर अँड डी), डॉ. यशवंत पवार (डीन पीजी) यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. सुमित्रा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलं व तिच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कु. सुमित्राने या यशामागील श्रेय आपल्या मार्गदर्शक प्राध्यापकांना व पालकांच्या सातत्यपूर्ण प्रेरणेला दिलं आहे. याशिवाय, तिने राष्ट्रीय स्तरावरील गेट परीक्षेतही दोन विषयांत यश संपादन करून आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिश्रमाचा एक नवा मापदंड स्थापित केला आहे.
या अभूतपूर्व कामगिरीमुळे सिंहगड महाविद्यालयाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा सन्मान आणि गौरव अधिकाधिक वृद्धिंगत झाला आहे. कु. सुमित्रा सांगोलकर या प्रेरणादायी युवतीचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरेल, अशी अपेक्षा सर्वांच्या मनात आहे.