संत श्री.सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विशेष लेख
उत्कट भगवदभक्ती व कर्मावर निष्ठा असणारे संत सेना महाराज
*आम्ही वारिका वारिक I करू हजामत बारीक II*
*विवेक दर्पण आयना दाऊ I वैराग्य चिमटा हालऊ II*
*उदक शांती डोई घोळू I अहंकाराची शेंडी पिळू II*
*भावार्थाच्या बगला झाडू I काम क्रोध नखे काढू II*
*चौवर्णा देऊनी हात I सेना राहिला निवांत II*
हा अभंग संत सेना महाराजांचा आहे. संत सेना महाराजांना संत सेना न्हावी या नावानेही ओळखले जाते. वरील अभंगात संत सेना महाराजांनी आम्ही *वारीक वारीक* असे म्हटले आहे, याचा अर्थ आम्ही *वारी करणारे* असा होतो. *वारीक याचा अर्थ वारी करणारे.* परंतु सेना महाराजांनी हा अभंग लिहिल्यामुळे कदाचित न्हावी या शब्दाला वारीक हा पर्यायी शब्द समजून महाराष्ट्रामध्ये न्हावी समाज स्वतःला वारीक म्हणतो.
मध्ययुगीन कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या समकालीन असणाऱ्या संत सेना महाराजांच्या अनेक अभंगातून ते करत असलेल्या व्यवसायाची माहिती कळून येते. सर्वच संत हे कर्मयोगी होते, आपल्या कामावर त्यांची निष्ठा होती, त्यामुळेच या संतांनी आपण जे काम करतो त्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला दिसून येतो. त्या कालखंडामध्ये संतांना देखील आपण करत असलेल्या कामाची माहिती इतरांना देणे कमीपणाचे वाटत नसे व त्याच नावाने संतांना ओळखले देखील जात. परंतु यामध्ये जातीयतेचा, श्रेष्ठ - कनिष्ठतेचा अथवा भेदभावाचा भाव नसायचा परंतु अलीकडच्या काळामध्ये असा भाव दुर्दैवाने निर्माण झालेला दिसून येतो. याच अस्मितेतून संतांना केवळ एका विशिष्ट जातीमध्ये अडकवण्याचा व त्याचेच भांडवल करून आपल्या जातीच्या अस्मिता आणखी टोकदार बनवण्याचा दुर्दैवाने प्रयत्न होत आहे. परंतु संत सेना महाराजांनी लिहिलेल्या वरील अभंगांमध्ये विवेकाचा आरसा दाखवण्याची जी भाषा केली आहे, ती मात्र आपण विसरून चाललो आहोत.
संत सेना महाराजांचा जन्म वैशाख वद्य द्वादशी रविवार सन १३०१ मध्ये झाला. मध्य प्रदेशातील कटनी जंक्शनकडून विलासपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमरिया नावाचे रेल्वे स्टेशन आहे, या रेल्वे स्टेशनपासून ईशान्येकडील अठरा मैलांवर बांधवगड आहे, जो बांधवगड बघेला राजघराण्याची राजधानी होता, अशा बांधवगडावर संत सेना महाराजांचा जन्म झाल्याचे इतिहासकार सांगतात. बघेला राजघरण्याची बांधवगड ही राजधानी अत्यंत समृद्ध अशी होती, त्यामुळेच संत सेना महाराजांचे पूर्वज कदाचित जगण्यासाठी महाराष्ट्रातून तिकडे गेले असावेत. संत सेना महाराजांचे वडील देविदास हे राजघराण्याचे सेवक होते. तत्कालीन रामराया या राजाला सल्ला देणे,त्यांची केशभूषा करणे, अंगास तेल लावणे, अंगमर्दन करून उटी लावणे व अभंग स्नान घालणे अशी कामे देविदास यांच्याकडे होती. सेना महाराजांची आई प्रेमकुंवरबाई या देखील अत्यंत सात्विक स्वभावाच्या होत्या. देविदास व प्रेमकुंवरबाई या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या संत सेना महाराजांची वृत्ती ही आध्यात्मिक होती. पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घरामध्ये पूर्वापार चालत आलेली होती, त्यामुळेच महाराष्ट्रातून उत्तर भारताच्या तीर्थयात्रेला आलेल्या संत मंडळींना बांधवगडावर सेना महाराजांचे घर हे विसाव्याचे स्थान होते. सेना महाराजांचे कुटुंबीय महाराष्ट्रीयन संतांची आपुलकीने सेवा करत असत. पंढरपूरची वारी व इतर सर्व संत मंडळींच्या कार्याची महती सेना महाराजांच्या कुटुंबीयांना असल्यामुळेच सेना महाराजांच्या वडिलांना कायम वाटायचे, की आपण पांडुरंगाच्या भेटीला जावे, सर्व संत महंतांच्या भेटी घ्याव्यात. परंतु राजाच्या पदरी चाकरी करत असल्यामुळे त्यांना कधी जमले नाही. परंतु सेना महाराजांना पंढरीला जाण्याचा ते कायम आग्रह धरत.
देविदास व प्रेमकुंवरबाई यांच्या निर्वाणानंतर सेना महाराजांवर घराची व राजाच्या सेवेची जबाबदारी येऊन पडली. अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगणारे सेना महाराज खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते, त्यामुळे अत्यंत निष्ठेने ते राजाची सेवा करत असत. एक दिवस सेना महाराजांकडे महाराष्ट्रीय संत मंडळी आली होती, त्यांच्या सेवेमध्ये मग्न असल्यामुळे राजांच्या सेवेसाठी सेना महाराजांना वेळेवर जाता आले नाही. वेळ होत असल्याचे लक्षात येतात राजाने सेवकाकरवी सेना महाराजांना निरोप पाठविला, परंतु सेवकाने मुद्दामून चुकीचा निरोप देऊन राजाची दिशाभूल केली. आपली नित्यनेमाने शिस्तबद्धरितीने सेवा करणारा सेवक आज उशीर झाला तरी का येत नाही याची राजाला एकीकडे काळजी वाटत असतानाच आलेल्या सेवकाने चुकीचा निरोप दिल्यामुळे राजा संतापला. संतापाच्या भरात त्याने संत सेना महाराजांना पकडून आणण्याचा आदेश दिला, परंतु त्याचवेळी खाकोटीला धोकटी मारून राजमहालात संत सेना महाराज येत असल्याचे राजाने पाहिले, राजाचा संताप कमी झाला. आलेल्या सेना महाराजांनी रोजच्याप्रमाणे राजाची केशरचना पूर्ण केली, अंगास तेल लावून अंगमर्दन करत असताना तेलाच्या वाटीमध्ये राजाची नजर गेली व राजाला संत सेना महाराजांच्या जागी शंख चक्र घेतलेल्या विष्णूची प्रतिमा दिसून आली. राजाने आरशात पाहिले तर संत सेना महाराजांच्या जागी प्रत्यक्ष भगवंतच राजाची सेवा करत असल्याचे दिसून आले. परंतु राजाने शरण जाण्यापूर्वीच संत सेना महाराजांच्या रूपामध्ये भगवंताने पुनश्च सेवा करण्यास सुरुवात केली. या साऱ्या प्रसंगाने राजा विस्मित झाला. संत सेना महाराजांच्या रूपात आलेल्या भगवंताने सेवा संपविली व ते निघून गेले व पुढच्याच क्षणाला खाकोटीला धोकटी मारून संत सेना महाराज रोजच्या सेवेसाठी लगबगीने राजमहालात दाखल झाले. राजाने घडलेला सर्व प्रसंग सांगितल्यानंतर संत सेना महाराज भावूक झाले व त्यांनी परमेश्वराचे स्मरण करायला सुरुवात केली. हे पाहून राजा संत सेना महाराजांना शरण गेला व सेना महाराजांचा त्यांनी गुरु म्हणून स्वीकार केला. आजही बघेला राजघराण्यातील वंशज सेना महाराजांच्या वंशजांना गुरु मानतात व त्यांच्याकडून गुरुमंत्राची दीक्षा घेतात.
सेना महाराजांनी समाजाच्या प्रबोधनासाठी इतर संतांप्रमाणेच अभंग रचना केली. राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र अशा तीन राज्यातील लोकभाषांमधून सेना महाराजांनी अभंगाची रचना केली आहे. आजच्या काळात चाललेला भाषावाद व भाषेच्या टोकदार अस्मिता पाहिल्यानंतर मध्ययुगीन कालखंडातील संतांनी भाषा व प्रांताच्या सीमा ओलांडून कशाप्रकारे कार्य केले होते हे आपल्याला लक्षात येते. संत नामदेव महाराजांचे अनेक अभंग शीख पंथीयांच्या गुरुग्रंथसाहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत, त्याचप्रमाणे संत सेना महाराजांचा एक अभंग या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आलेला आहे, यावरून सेना महाराजांच्या उत्तर भारतातील कार्याची आपल्याला जाणीव होऊ शकेल. संत सेना महाराजांचे एकूण २५७ अभंग उपलब्ध आहेत. यातील रूपाचे ७ अभंग, विठ्ठलाचे वर्णन करणारे २१ अभंग, नाम महात्म्य सांगणारे ३३ अभंग, विठ्ठलाची अनन्य भक्ती सांगणारा १ अभंग, कीर्तनाची महती सांगणारे ३ अभंग, मोक्षाची तुच्छता व संतांचे महात्म्य सांगणारा १ अभंग, दर्शनपर ६ अभंग, परमेश्वराला विनंती करणारे २० अभंग, वत्सलतेने भक्ती कशी करावी हे सांगणारे १२ अभंग, भक्तीमुळे आनंदाची अवस्था कशी प्राप्त होते हे सांगणारे ५ अभंग, संतांचे महात्म्य सांगणारे ३८ अभंग, तीर्थ व तीर्थयात्रेचे महत्त्व सांगणारे ९ अभंग, संतांची चरित्रे विशद करणारे ३ अभंग, निर्वाणपर २ अभंग, लोकांना कसे वागावे याचा उपदेश करणारे ३४ अभंग, व्यावहारिक शहाणपणा सांगणारे ४० अभंग, आपल्या व्यवसायाविषयीचा उल्लेख असणारे ४ अभंग, त्यांनी रचलेल्या एकूण १३ गौळणी, वासुदेव या रूपकाबद्दलचा १ अभंग, काल्याचा १ अभंग, १ अंगाई गीत व २ आरत्या असे एकूण उपलब्ध २५७ अभंग आहेत. या अभंगातून समाजाच्या मनाचे भरण पोषण करण्याचे, समाजजागृती करण्याचे कार्य संत सेना महाराजांनी केले.
तत्कालीन परिस्थितीमध्ये अठरापगड जातीतून संत निर्माण झाले, या साऱ्याच संतांनी हिंदू समाजाला एकसंध करण्याचा, जातीभेद - भेदाभेद - अस्पृश्यता यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या मंडळींमध्ये संत सेना महाराजांचे कार्य महत्त्वपूर्ण असेच आहे. आपल्या वडिलांची इच्छा व पांडुरंगाच्या भेटीची ओढ यामुळे संत सेना महाराज महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातील अनेक संतांच्या त्यांनी भेटी घेतल्या, पंढरीरायाला भेटल्यानंतर अनेक तीर्थक्षेत्राला ते जाऊन राहिले व बऱ्याच कालखंडानंतर पुन्हा ते बांधवगडावर परतले. तेथील राजाने संत सेना महाराजांचा सन्मान केला. संत सेना महाराज बांधवगडावर परतले परंतु त्यांचे संसारात अथवा व्यवसायात मन रमत नव्हते. कायम विठ्ठल भक्तीत रममान असणाऱ्या सेना महाराजांनी श्रावण वद्य द्वादशी या दिवशी समाधी घेतली. अठरापगड जातीमध्ये संत निर्माण झाले, या संतांनी भेदाभेद दूर करून हिंदू समाजाला एक करण्याचे काम केले, हे करत असताना कर्माला महत्व दिले. संत सेना महाराजांनी आयुष्यभर आपल्या सेवेतून, कर्मातून व प्रबोधनातून समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले. आजही त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजाने चालायचे ठरवले तर जातीच्या अस्मिता आपोआप गळून पडतील.
*- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर*