पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहरातून तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाकडे जाणाऱ्या रेल्वे (ब्रीज) पुलाखालील कॉंक्रिटीकरण करताना संपूर्ण रस्ताबंद ठेवू नये अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सोलापूर रेल्वे विभागाकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
कॉंक्रिटीकरणासाठी सुमारे २० दिवस संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे व टाकळी भुयारी मार्ग किंवा सरगम चौक अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सुचविण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे व गैरसोयीचे आहे.
सदर रस्त्यावर तहसील कार्यालय, पंचायत समिती,तालुका पोलीस स्टेशन, डीवायएसपी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग इ.महत्त्वाची कार्यालये दोनशे मीटर अंतरावर आहेत. शिवाय बालवाडी, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक, उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालय ही शैक्षणिक संस्था रेल्वे लाईन लगत आहे.तेथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने महत्त्वाची कार्यालये, शैक्षणिक संस्था अगदी जवळच आहेत याचा विचार करून एका मार्गाचे काम करताना शेजारचा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून चालू ठेवणे आवश्यक आहे. हे न करता २० दिवसासाठी रस्ता बंद म्हणून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.हे पुर्णपणे चुकीचे आहे.
हा संपूर्ण रस्ता २० दिवसासाठी बंद केल्यास नाईलाजाने पालक,विद्यार्थी, या कार्यालयाकडे जाणारे नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून जातील, कारण २०० मीटर अंतरासाठी एका बाजूने किमान दोन किलोमीटर तर दुसऱ्या पर्यायी मार्गाने तीन किलोमीटर इतके अंतर पार करावे लागेल. त्यामुळे सामान्यपणे विचार केल्यास हे अत्यंत गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे नागरिक,पालक,विद्यार्थी जवळचा मार्ग म्हणून धोका पत्करुन रेल्वे रुळावरून ये जा करतील, धोका झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वे विभागावर येईल.
तरी विनंती की,काॅंक्रिटिकरणाचे काम करताना स्थानिक परिस्थितीचा विचार करून नजिकचा एक रस्ता चालु ठेवतील अशी अपेक्षा सोलापूर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विनोद भरते,जिल्हा पालक सुभाष सरदेशमुख, ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये यांनी व्यक्त केली आहे.