करिअरसाठी निर्माण होणाऱ्या संधी शोधता आल्या पाहिजेत चेअरमन रमेश अय्यर
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील प्रश्नांचा अभ्यास करावा, त्यातून नवीन संकल्पना निर्माण होतात आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी त्या नवीन कल्पनांचा वापर करावा, यासाठी मार्केट मध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांंना आपल्या विचारांतून समाजाचे प्रश्न देखील सोडवता आले पाहिजेत. सभोवती निर्माण होणार्या करिअरच्या संधी आपल्याला शोधता आल्या पाहिजेत.’ असे प्रतिपादन ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरीया’चे चेअरमन तथा टीसीएस चे कोरियातील मुख्य अधिकारी रमेश अय्यर यांनी केले
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजिलेल्या ‘अॅन इंटरॅक्शन सेशन’ मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरीया’ चे चेअरमन रमेश अय्यर हे सामंजस्य कराराच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी ‘रिसर्च अँड इंटरनॅशनल अॅकडमीक्स’चे सल्लागार डॉ. दिनेश अंमळनेरकर हे होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या वाटचालीमधील महत्वाचे टप्पे व मानांकने याबाबत सांगून या सामंजस्य करारासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी कोरीयामधील ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरीया’ आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यात एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामंजस्य करार स्थापित करण्यात आला. सांस्कृतिक देवाण-घेवाण, विद्यार्थी देवाण-घेवाण आदि विविध उपक्रमांसाठी या कराराचा फायदा होणार आहे. स्वेरी आणि इतर संस्था यांच्यामधील सामंजस्य करारामुळे स्वेरी तील संशोधन व विकास विभागाला आणखी गती मिळत आहे. कोरीयामधील ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरीया’ ही शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यावसायिक सेवा पुरवणारी आणि तंत्रज्ञानात अनुभव असलेली संस्था आहे. या राष्ट्रीय दर्जाच्या सामंजस्य करारामुळे ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरीया’ ही संस्था स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना भारतीय आणि कोरीयन विद्यापीठांमधील संयुक्त अभ्यासक्रम कार्यक्रमांना प्रोत्साहन देईल तसेच कोरीयन भाषा कौशल्य क्षमतेसह भारतात युवा पिढी निर्माण करण्यासाठी सहकार्य करतील तसेच विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देईल. विशेषतः हा करार अभ्यासाच्या व विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामंजस्य करारामुळे स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत होणार आहे. पुढे बोलताना अय्यर म्हणाले की, ‘प्रत्येक बाबीमध्ये संयमी असावा, तसेच सकाळी सकारात्मक उर्जा जास्त असते त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचे फायदे खूप होतात. सध्याची आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, शारीरिक तंदुरूस्ती, करिअर, चांगल्या सवयी पुढे आपले करिअर घडवितात. त्यासाठी मोठी स्वप्ने पहावीत आणि त्याचा पाठलाग प्रामाणिकपणे करावा तसेच जीवनात आई वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास त्यांच्या परिश्रमाला आणि संघर्षाला न्याय मिळतो.’ असे सांगून चेंबर ऑफ कॉमर्स चे कार्य सांगून बिजनेस, आयडिया, भांडवल उभारणी याबाबतही मोलाची माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. दिनेश अंमळनेरकर म्हणाले की,’ आपण कोणत्याही क्षेत्रात असताना आपले म्हणणे थोडक्यात मांडण्याचे भाषा कौशल्य शिकायला हवे, विविध क्षेत्रात संवाद साधताना योग्य भाषेची निवड करावी. त्यामुळे चांगल्या व्यासपीठाची निर्मिती करता येईल. आपण सेवा देण्यात पुढे आहोत पण वस्तूंचे उत्पादन करण्याबाबत कमी पडतोय यासाठी संशोधनावर भर द्यावा.’ असे सांगितले. या सामंजस्य करारावर ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरीया’चे चेअरमन रमेश अय्यर तसेच स्वेरीच्या वतीने स्वेरीचे नूतन सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वनाथ अय्यर, अॅड. दिनेश अय्यर, डॉ. रामदास बिरादार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, सामंजस्य करार समन्वयिका डॉ. नीता कुलकर्णी, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी या सामंजस्य कराराचे स्वागत केले आहे. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे नूतन सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी आभार मानले.