पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी फैय्याज रफीक तांबोळी यांची निवड आयट्रिपलई १०च्या एडहॉक कमिटी ऑन इंटरप्रणरशिप अंड इनोव्हेशन (ए.सी.इ.आय.) अॅम्बॅसिडर प्रोग्राम २०२५ साठी झाली असून ही एक अतिशय गौरवाची बाब आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आयट्रिपलई १०च्या ए.सी.इ.आय. अॅम्बॅसिडर प्रोग्राम हा आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील उद्योजकता आणि नवकल्पना वाढविण्यासाठी आयट्रिपलई अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स कडून राबवण्यात येणारा एक उच्चस्तरीय कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमात फैय्याज तांबोळी यांची निवड बॉम्बे विभागा अंतर्गत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून झाली आहे. ही निवड महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. याचा उद्देश आणि जबाबदारी पाहिली असता निवड झालेल्या अॅम्बॅसिडरना त्यांच्या विभागात किंवा परिसरात उद्योजकता विषयक कार्यक्रम, स्टार्टअप पिचिंग स्पर्धा, नवकल्पनांवरील कार्यशाळा आणि नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित करायचे असतात. त्यासाठी आयट्रिपलई कडून संपूर्ण मार्गदर्शन, मार्गदर्शक (मेंटर) आणि तांत्रिक पाठबळ पुरवले जाते. फैयाज यांना आता जून ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयट्रिपलई अंतर्गत उद्योजकता संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करायचे असून, त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना आयट्रिपलई रिकग्नायझेशन, प्रमाणपत्रे, तसेच जागतिक पातळीवरील ‘आयट्रिपलई इंटरप्रन्युअरशिप समीट’ मध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल. फैय्याज तांबोळी हे तांत्रिक उपक्रम, स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि विद्यार्थी संघटनांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. आयट्रिपलई स्टुडंट ब्रँचचे सक्रीय सदस्य म्हणून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामुळे नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाने अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबवले आहेत. ‘फैय्याजच्या या निवडीमुळे आमच्या महाविद्यालयाच्या नावात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातून अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरील निवड म्हणजेच गुणवत्तेचा, चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा विजय आहे.’ असे मत आयट्रिपलई च्या समन्वयिका प्रा. स्मिता गावडे यांनी व्यक्त केले. फैय्याज तांबोळी यांची ही निवड केवळ एक वैयक्तिक यश नसून संपूर्ण महाविद्यालय, त्यांचे शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरासाठी प्रेरणादायी घटना ठरली आहे तसेच या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणखी संधी उपलब्ध होतील हे मात्र नक्की!
फैयाज तांबोळी यांना स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी. पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ई अँड टीसी विभागाचे प्रमुख डॉ. सुमंत आनंद, तसेच आयट्रिपलई चे शाखा सल्लागार डॉ. महेश मठपती यांचे मार्गदर्शन लाभले.