सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील बहुचर्चित जुनी मिल जागेच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी राहणार बाळे ,सोलापूर याचा जामीन अटी शिथिल करण्याबाबतचा दावा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी फेटाळून लावला आहे त्यामुळे या भूखंड घोटाळ्यातील आरोपी कुमार करजगी तसेच सुरेंद्र कर्णिक यास हायकोर्टाचा दणका बसला आहे.
सोलापुरातील जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या सुमारे १३७ एकर जागेच्या भूखंड घोटाळ्यामध्ये कुमार करजगी, सुरेंद्र कर्णिक व स्वर्गीय शरद मुथा यांच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी जागेची फसवणूक व आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या गंभीर गुन्ह्याबाबत २०१७ रोजी सोलापूर येथील न्यायालयामध्ये दावा दाखल झाला आहे. त्यामध्ये कुमार करजगी यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गडकरी यांनी दिनांक २८/११/२०१७ रोजी सुमारे २ कोटी ९० लाख रुपये भरून दर महिन्यास पहिल्या सोमवारी पोलिसांकडे हजेरी लावणे, संबंधित दाव्यामध्ये दर तारखेस कोर्टात हजर राहणे, दाव्यातील जमिनीच्या पुराव्या मध्ये कोणतीही छेडछाड न करणे व सभासदांवर कोणताही दबाव न टाकणे अशा विविध अटींवर जामीन मंजूर केलेला असताना कुमार करजगी याने वारंवार या सर्व जामीन अटींचा भंग केल्यामुळे जुनी मील बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूरचे सचिव डॉ.संदीप आडके यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करून दाद मागितलेली होती. २७ मार्च २०२४ रोजी उच्च न्यायालय, मुंबई येथे कुमार करजगीस काही काळासाठी प्रतिबंधित करून पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये १० जानेवारी २०२५ रोजी करजगी याने जामीन अटींचा भंग केल्याचे मान्य करून त्याचे यापुढे पालन केले जाईल असे प्रतिज्ञापत्र दिले होते. कोर्टाने यापुढे वरील सर्व जामीन अटींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश, तसेच २०१७ पासून प्रलंबित असलेला दावा लवकर निकाली लावणे ,डॉ. संदीप आडके यांना सोलापुर येथील ट्रायल कोर्टामध्ये म्हणणे मांडण्याची संधी देणे असे हुकूम केले होते. त्यानंतर पुन्हा कुमार करजगी याने जामीन अटी शिथिल कराव्यात असा अर्ज केला असता सदर जामिन अटी येथून पुढे पाळल्या जातील असे मागील आदेशा मध्ये मान्य केल्यामुळे या अटी आता रद्द करता येणार नाहीत असा अर्जदारांचे वकील व सरकारी वकीलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला व तो ग्राह्य धरण्यात आला. सदर दाव्यामध्ये अर्जदार डॉ.आडके यांच्यातर्फे आर् व्ही संकपाळ अँड असोसिएट चे एडव्होकेट रवींद्र संकपाळ व सरकार पक्षातर्फे एडव्होकेट के. सी. शिंदे तसेच फिर्यादी तर्फे एडव्होकेट विजय उपाध्याय, ओंकार गीध व आशा कंजारिया यांनी काम पाहिले.
१९८८ साली कुमार शंकर करजगी याने जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टची स्थापना करून जुनी मिलची कोर्टातून लिलावात निघालेली १३७ एकर जागा सभासदांच्या पैशातून मुंबई उच्च न्यायालयातून १९९६ ते ९८ दरम्यान ट्रस्टच्या नावे ताब्यात घेतली. त्यानंतर खोट्या कागदपत्राद्वारे त्याने सर्व सभासदांची फसवणूक करून उमा सहकारी गृहनिर्माण संस्था या बोगस संस्थेची आपल्या वडिलांच्या बाळे येथील शेत जमिनीवर नोंद करून वरील संस्थेची १३७ एकर जागेवर नगर भूमापन अधिकारी व शहर उपनिबंधक यांच्या संगनमताने १९९८ ला उताऱ्यावर बोगस पद्धतीने उमा सहकारी संस्थेचे नाव लावून घेतले होते. त्यानंतर कुमार करजगीने कोणत्याही मूळ सभासदांना जागा न देता अनधिकृतपणे वरील जागा विकण्यास व भाड्याने देण्याचा सपाटा लावला होता. २००६ सालीच चौकशी होऊन माननीय धर्मादाय आयुक्त यांनी कुमार करजगी व त्याच्या सर्व संचालक मंडळास कायमस्वरूपी बरखास्त केले. पुढे २०१७ साली ट्रस्टच्या ३०० सभासदांच्या पोलीस तक्रारीवर फौजदारी केस दाखल होऊन आजपर्यंत ही केस सोलापूर न्यायालयामध्ये न्यायाधीश मारडेकर यांच्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे .जुनी मील भूखंड घोटाळ्यामध्ये कुमार करजगी, सुरेंद्र कर्णिक व कैलासवासी शरद मुथा यांनी व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. मागील दोन वर्षांमध्ये ट्रस्टची पुनर्रचना करून डॉ. संदीप आडके व त्यांचे संचालक मंडळ हे वरील जागेच्या घोटाळ्याबाबत काम पाहत आहेत. ही जागा सोलापूर येथे जुनी मिल कंपाऊंड, विजापूर रोड जवळील मोतीबाग, हीरज रोड ,उमा नगरी नावे ओळखली जाणारी जागा ,एसटी स्टँड समोरील धरमसी लाईन अशा विविध पाच ठिकाणी आहे व सदर जागा संस्थेच्या नावे नोंदणीकृत केलेली आहे. या जागेचे ट्रस्टच्या संमतीशिवाय कोणीही व्यवहार करून फसवणूक करून घेऊ नये असा सावधानतेचा इशारा सुद्धा ट्रस्टतर्फे डॉ. संदीप आडके यांनी दिलेला आहे. लवकरच कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिक यांचे जामीन रद्द करण्याचे सुद्धा काम सुरू करणार आहे व ट्रस्टच्या सर्व सभासदांना कायदेशीर रित्या प्लॉटचे वाटप केल्या जाईल असे त्यांनी सांगितले.
या निकालामुळे मागील अनेक वर्षे सोलापूरमध्ये उद्योगपती व समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या कुमार करजगी व त्याच्या टोळीस दणका बसल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.