खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस चौथा
पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी हरियाणाच्या मनीष नरवाल यांनी शानदार कामगिरी करत २२९.२ गुण घेत सुवर्णपदक पटकावले. श्री. शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी त्यांनी ही सुवर्ण कामगिरी केली.
मनीष यांनी P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1 प्रकारात राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल यांचा ०.७ गुणांच्या फरकाने पराभव केला. यामुळे रुद्रांश यांना २२९.२ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर हरियाणाच्या संदीप कुमार यांनी २०८.१ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली.
चौथ्या दिवशी खेळण्यात आलेली स्पर्धा अत्यंत चुरशीची राहिली. पहिल्या फेरीपासूनच मनीष नरवाल आणि रुद्रांश खंडेलवाल यांच्यात गुणांची चुरस दिसत होती. अखेरीस मनीष यांनी शेवटच्या सिरीजमध्ये उत्कृष्ट १०.४ पॉईंटची नेमबाजी करत आघाडी घेतली आणि सुवर्णपदक निश्चित केले.
इतर खेळाडूंमध्ये राजस्थानच्या निहाल सिंह यांनी १८६.० गुणांसह चौथा क्रमांक मिळवला. आर्मीच्या आमिर अहमद (१६३.६ गुण) पाचव्या स्थानावर राहिले, तर तामिळनाडूच्या संजय कुमार (१४२.० गुण) सहाव्या, उत्तर प्रदेशच्या आकाश (१२६.६ गुण) सातव्या आणि हरियाणाच्या सिंहराज (१०१.६ गुण) आठव्या क्रमांकावर राहिले.