आटपाडी प्रतिनिधी तेज न्यूज
निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून गोमेवाडी येथील कु . कल्पना उत्तम दबडे या ४५ वर्षीय दिव्यांग अविवाहीत युवतीने गोमेवाडीतील शासकीय जागेत उभे केलेले सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे शेड अज्ञातांनी गायब केल्याने मोठी खळबळ माजली आहे .
सुमारे २३ वर्षापासून गोमेवाडीच्या एस . टी . थांब्याच्या परिसरातच प्रारंभी STD बुध चालविण्याच्या आणि नंतर स्टेशनरी, किराणा, टेलरिंग साठीच्या शेडमधून व्यवसाय करीत आपली उपजिविका करणाऱ्या कल्पना उत्तम दबडे या दिव्यांग युवतीने गोमेवाडीत आपला जम बसविला होता .
प्रारंभी आई, वडिल, भाऊ यांच्यासमवेत हराटी या गोमेवाडी हद्दीतल्या मळ्यात राहणाऱ्या आणि तीन चाकी सायकल वरून गोमेवाडी गावात येवून आपला स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या कल्पना दबडे या आई - वडिल यांच्या निधनानंतर स्टॅन्ड परिसरातल्या पुर्वाश्रमीच्या देशपांडे वाड्यात भाड्याच्या खोलीत अनेक वर्षे रहात होत्या. तथापि मालकाने नवीन बांधकामासाठी वाडा पाडल्याने कल्पना दबडे यांना दुर अंतरावरच्या कोळेकर यांच्या निवासस्थानी आश्रयास जावे लागले . तेथेही त्यांना प्रतिमहिना ३ हजार भाडे चुकवावे लागत आहे .
वाद झाल्याने भावाशी फारकत घेतलेल्या कल्पना दबडे यांनी गत दशकात गोमेवाडी ग्रामपंचायतीने आपल्याला घरासाठी जागा आणि शासकीय योजनेतून घरकुल द्यावे यासाठी अनेक वेळा तोंडी - लेखी मागणी करूनही या दिव्यांग युवतीविषयी गत दशकातल्या गोमेवाडी ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना कणव आली नाही . हे वास्तव असल्याचे कल्पना दबडे सांगत आहेत .
दि . १६ ऑगस्ट रोजी कल्पना दबडे यांनी काही जणांच्या मदतीने गोमेवाडी - हिवतड रोड लगतच्या शासकीय जागेत निवाऱ्यासाठी शेड उभे केले . कर्ज काढून या शेड आणि त्यातील साहित्यासाठी दीड लाख रुपये खर्च केले होते. असे कल्पना दबडे जाहीररित्या प्रसार माध्यमातून सांगत आहेत . हे शेड उभारल्याचे दुसऱ्याच दिवसाच्या रात्री अर्थात दि . १७ ऑगस्ट रोजी रात्री काही जणांनी हे निवारा शेड काढून नेत ते गायब केल्याचा आरोप करत कल्पना दबडे यांनी आटपाडी पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली आहे .
आपल्या या शासकीय जागेतल्या निवारा शेडला काही मान्यवरांचा विरोध होता आणि त्यांचा विरोध डावलून आपण हे निवारा शेड उभे केल्याचा राग मनात धरून त्या मान्यवरांनी हे शेड गायब केले असावे . ते लोक शेड गायब झाल्याच्या त्या रात्री त्याच परिसरात आपल्या निदर्शनास आले होते, असा कयास करणारा आरोप कल्पना दबडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जात काही जणांची नावे घालून केला आहे .
गोमेवाडी येथील शासकीय जागेवर, गायरानात ज्यांनी ज्यांनी घरे, बंगले, व्यवसायाची दुकाने लावली आहेत . त्या सर्वांना तेथे राहण्यास, व्यवसाय करणेस शासनाने रितसर परवानगी दिली आहे का ? आणि ज्यांना, दिल्या गेलेल्या शासकीय परवानगीत, निश्चित केलेल्या मोजमापा प्रमाणेच त्या सर्वांची घरे, वास्तू , दुकाने, बंगले आहेत का ?, एका असाय्य, उपेक्षित, वंचित, गरीब, दिव्यांग युवतीचे निवारा शेड काढणारांनी अनेक वर्षापासून अन्य अनेक अतिक्रमणांना आजअखेर का अभय दिले आहे ? याची उच्चस्तरीय चौकशी होणे महत्वाचे आहे . निवासासाठी जागा व घरकुल मागणाऱ्या कल्पना दबडे यांच्या विषयी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना का कणव, दया आली नाही . शासकीय जागेवर दिव्यांग युवतीने उभ्या केलेल्या शेड काढणे, गायब करण्यासाठी जेवढी शीघ्र गतीने कारवाई केली गेली, या अन्यायी प्रकरणाची, गटविकास अधिकारी, तहसिलदार, पोलीस खात्याचे अधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी महोदय, जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी महोदयांनी सखोल चौकशी करून या दिव्यांग युवती च्या शेडबाबतीत अन्यायी भूमिका घेतलेल्या सर्वांवर योग्य ती कारवाई केली गेली पाहीजे, तसेच ज्या वाहनातून हे साहित्य नेण्यात आले त्या वाहन चालक मालक आणि या सर्वांना पुढे करणाऱ्या पडद्यामागच्या पदाधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उगारला पाहीजे . असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे .
कल्पना दबडे या, माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या अनेक वर्षापासूनच्या पदाधिकारी आहेत . त्या राज्यभर या संघटनेत सक्रीय व सुपरिचित आहेत . सध्या त्या सांगली जिल्हा महिला सचिव या पदावर कार्यरत आहेत . काबाडकष्ट कष्ट करून आपली उपजिविका करीत समाजसेवा करणाऱ्या या दिव्यांग युवतीच्या बाबतीत एवढा विरोध का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . कल्पना दबडे यांचे गायब केलेले निवारा शेड त्यांना पूर्ववत त्याच शासकीय जागेत बसवून देत, शासनकर्त्यांनी ती दोन गुंठे जागा आणि योग्य शासकीय निकषाचे घरकुल बांधणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देत .
या स्वतःच्या पायावर एकट्याने जीवघेणा संघर्ष करीत असलेल्या दिव्यांग अभागी युवतीला न्याय मिळवून द्यावा . तसेच निवारा शेड गायब करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी . अशी जनभावना आहे . कल्पना दबडे यांच्यावर झालेल्या अन्यायावर तात्काळ न्याय न मिळाल्यास प्रहार संघटनेचे राज्यातील शेकडो दिव्यांग पदाधिकारी मोठे आंदोलन उभे करण्याची शक्यता निर्माण झाली आहे . तशा सर्वांच्या हालचाली सुरु आहेत .