पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणुनगर, गुरसाळे येथील तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक श्री.राजाराम शहाजी म्हेत्रे यांनी २०२२ साली झालेल्या निवडणुकीदरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मा. न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग यांचे न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पंढरपूरच्या सहकारक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, सदर प्रकरणातील मूळ फिर्यादी स्वेरी, पंढरपूरचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांची खर्डी या गावी शेती असून, ते श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. सन २०२२ मध्ये झालेल्या कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीदरम्यान डॉ.बी. पी. रोंगे यांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सदर निवडणुकीत अर्ज सादर करतेवेळी त्यांनी दि. २ जून, २०२२ रोजीचे आरोपी श्री. म्हेत्रे यांच्या सहीचे मागील सात वर्षांपैकी चार वर्षे कारखान्यात ऊस घातल्यासंदर्भात प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे दाखल करून सर्व अटींची पूर्तता केली होती.
तथापि कारखान्याच्या सन २०२२ साली झालेल्या निवडणुकीत डॉ. रोंगे यांचा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज रद्द व्हावा या दुष्ट उद्देशाने आरोपी श्री. म्हेत्रे यांनी दि. १० जून, २०२२ रोजी अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर डॉ. रोंगे यांनी मागील सात वर्षांपैकी फक्त दोनच वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ऊस घातला आहे असे खोटे प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे डॉ. रोंगे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला. यानंतर डॉ. रोंगे यांनी दि. १३ जून, २०२२ रोजी परत आरोपीकडे सदर कारखान्यास ऊस गळितास दिल्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चार वर्षे ऊस घातल्याबाबतचे दि. २ जून, २०२२ रोजी दिलेल्या प्रमाणपत्रासारखेच खरे प्रमाणपत्र दिले. एकूण प्रकरणात आरोपी राजाराम शहाजी म्हेत्रे यांनी कारखाना प्रशासनातील एक जबाबदार व्यक्ती असतानाही डॉ. रोंगे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर व्हावा या दृष्टीने हेतुपुरस्सर खोटा व बनावट दाखला बनवला व तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा तयार केलेला पुरावा ग्राह्य मानत डॉ. बी. पी. रोंगे यांचा निवडणूक अर्ज नामंजूर केला.
आरोपी राजाराम शहाजी म्हेत्रे यांनी कायदेशीर प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समोर सत्य माहिती सादर करणे बंधनकारक असतानाही केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करत खोटे पुरावे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केले. याबाबत फिर्यादी डॉ. बी. पी. रोंगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नागेश पाटील यांचेकडे श्री. राजाराम म्हेत्रे यांनी खोटी माहिती सादर केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करावा असे पत्र दिले. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नागेश पाटील यांनी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्याने डॉ रोंगे यांनी कोर्टात धाव घेत श्री. म्हेत्रे यांच्या विरोधात केस दाखल केली असता मा.न्यायालयाने यासंदर्भातील कागदपत्रे पाहत फिर्यादींच्या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले. यात मा. न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या आरोपीने खोटे प्रमाणपत्र दिल्याचे मत नोंदवले व आरोपी श्री. राजाराम शहाजी म्हेत्रे यांचे विरुद्ध कलम ४६७, ४६८, ४७१, १९१, १९२, १९३, १९७, १९८ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादी तर्फे ॲड. यासिन शेख, ॲड. शाहिद शेख, ॲड. झीशान शेख व ॲड. विजय खडतरे यांनी काम पाहिले. सहकारक्षेत्रात होणाऱ्या प्रगतीच्या प्रक्रियेत झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावणाऱ्या अशा अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणविल्या जाणाऱ्या श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बंधू भगिनींनी समाधान व्यक्त केले आहे.
त्यासोबतच सहकारक्षेत्रात सामान्य शेतकऱ्याच्या हिताविरोधात साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ किंवा इतर कोणाच्याही दबावापोटी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी असे चुकीचे धाडसी कृत्य करू नये असा महत्वपूर्ण संदेश या प्रकरणातून दिला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.