पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा रविवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत.आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरात तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. साठलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने 24 तासांची स्वच्छता मोहीम सुरु केली असून, शहरात ठिकठिकाणी साठलेला कचरा शिल्लक राहू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आज शहरातील विविध ठिकाणची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत, प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य निरिक्षक शरद, वाघमारे, नागनाथ तोडकर, नाना गोरे उपस्थित होते.
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविक वाखरी, रेल्वे स्टेशन, टाकळी, कासेगाव रोड, ६५ एकर परिसरासह शहरातील अन्य मोकळे मैदान, मठ, नागरिकांच्या घरात मुक्कामी होते़ यामुळे कचराकुंड्यांत शिळे अन्न, पत्रावळ्या मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच यात्रा कालावधीत अनेक छोटे-छोटे व्यापारी व्यवसाय करत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या. यामुळे दररोज शहरातून मोठ्या प्रमाणात कचरा उचलला जात आहे. वाळवंटात विशेष स्वच्छता राहावी म्हणून पंढरपूर नगरपरिषद व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत शहरात दररोज स्वच्छता करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावेळी सांगितले.