जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन पंढरपूर शहर स्वच्छ ठेवल्याबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले, त्यांच्याशी संवाद साधत चहापाणी व नास्ता ही त्यांच्याकडे घेतला.
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. दिनांक 26 जून ते 10 जुलै हा आषाढी यात्रा कालावधी असून या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात येणाऱ्या लाख खूप भाविकांसाठी शासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनी मध्ये राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन यात्रा कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करून संपूर्ण शहर व परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावर्षीचे आषाढी वारी विविध दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाली. यात स्वच्छतेला ही खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आलेले होते. या वारीसाठी पंढरपूर शहरात वीस लाखापेक्षा अधिक भाविक आलेले होते या सर्व भाविकांना विविध सुविधा देताना शहर स्वच्छ राहणार नाही यासाठी प्रशासनाने विविध भागात मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती व त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या सुपरवायझर यांच्यामार्फत सर्व ठिकाणी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यात आले. यात सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
येथील स्वच्छतेबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच वारकरी, भाविक यांनी भरभरून कौतुक केले. स्वच्छतेमुळे येथे येणारे वारकरी भाविक खूप समाधानी होते. ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम वेळोवेळी राबवून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशा सर्व सफाई कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर शहरात असलेल्या गुजराती कॉलनीत जाऊन तेथील सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व त्यांनी स्वच्छता मोहिमेत घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांच्या समवेत चहा पाणी व नाश्ताही घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे , मुख्याधिकारी महेश रोकडे व अन्य अधिकारी तसेच सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.