वेळापूर प्रतिनिधी तेज न्यूज
रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूजच्या कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी RAWE (Rural Agricultural Work Experience) या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तांदुळवाडी गावामध्ये टोमॅटो पिकामध्ये स्टेकिंग (आधार देणे) पद्धतीचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पाडले.
या कार्यक्रमाचे आयोजन टोमॅटो पिकामध्ये उत्पादनातील वाढ, फळांचे संरक्षण आणि रोपांची योग्य वाढ यासाठी स्टेकिंग पद्धतीचा वापर कसा करावा, हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी करण्यात आले होते. प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांनी लाकडी काठ्या व मजबूत दोऱ्याचा वापर करून टोमॅटो रोपांना आधार देण्याची योग्य पद्धत शेतकऱ्यांसमोर सादर केली.
स्टेकिंगमुळे झाडे जमिनीवर न पडता उभी राहत असल्यामुळे फळांना मातीचा संपर्क येत नाही, परिणामी फळांची गुणवत्ताही टिकते. शिवाय झाडांमध्ये हवेचा व प्रकाशाचा योग्य संचार होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे उत्पादनात वाढ तर होतेच, पण त्याचबरोबर काढणी व तोडणीची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी दिले.
कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी या नवतंत्रज्ञानाचे कौतुक करत, “स्टेकिंग ही सोपी व कमी खर्चिक पद्धत असून ती आमच्या शेतात लगेचच अवलंबणार,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील ,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे अकलूज प्राचार्य .आर .जी . नलावडे ,प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक ) ,प्रा. एम .एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) ,विषय तज्ञ प्रा.एस.एस.भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत अविराज पवार, श्रीधर मारकड, सुयश बागल, संदेश मोरे, अनिकेत चव्हाण, महेश गंगथडे, प्रथमेश चव्हाण, विवेक थोरात यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . हे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी विजय सुर्वे यांच्या शेतामध्ये घेण्यात आले.