भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील कृषीदूत क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य, शिंदे आविष्कार यांनी पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी गावात माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
या उपक्रमात शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले गेले. माती हे शेतीचे मूलभूत आधारस्तंभ असून, तिच्या पोषणमूल्यांची माहिती घेतल्याशिवाय योग्य शेती नियोजन करणे अशक्य आहे.
कृषीदूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, माती आरोग्यदृष्ट्या समृद्ध असेल तरच घेतलेल्या पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारते. त्यामुळे नियमित माती परीक्षण करून, मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता शोधणे आणि त्या अनुसार खत व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. या प्रसंगी माती नमुना घेण्याची योग्य पद्धत, नमुन्याचे प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया आणि अहवालानुसार योग्य सुधारणा कशा कराव्यात, याचे प्रात्यक्षिक पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम. एम. चंदनकर, (कार्यक्रम अधिकारी) प्रा. एच. व्ही. कल्याणी,(कार्यक्रम अधिकारी) तसेच विषयतज्ञ प्रा. एस. आर. अडत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत माती परीक्षणाचे महत्त्व जाणले आणि भविष्यात नियमितपणे माती परीक्षण करून वैज्ञानिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीकडे जाणारा मार्गदर्शक टप्पा ठरला.