पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभागामार्फत द्वितीय वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय प्रारंभिक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी ही आजच्या डिजिटल युगातील एक अत्यंत गतिमान आणि प्रभावी शाखा आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, सॅटेलाइट कम्युनिकेशन, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळाशी या शाखेचे मूलभूत योगदान आहे. त्यामुळे, मिळालेल्या संधीचे सोनं करण्यासाठी मेहनत, सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती आवश्यक आहे."
डॉ. मुलाणी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विभागाची ओळख, संस्थेचे ध्येय व मूल्ये, तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील संधी आणि जबाबदाऱ्या याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमातील महत्त्वाचे विषय, निवडणुकीचे पर्याय, व विविध स्पर्धा परीक्षा (गेट, यूपीएससी इत्यादी) विषयी माहिती देण्यात आली. तसेच वेळ व्यवस्थापन, साप्ताहिक अभ्यास नियोजन,पेटंट व कॉपीराईट, इंटर्नशिप संधी, एनपीटीईएल सारख्या ऑनलाईन कोर्सेस मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, विभागातील IETE, ETELSA, Innovation Club या तीन प्रमुख विद्यार्थी संघटनांची ओळख करून देण्यात आली
या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच दृष्टीकोन, आत्मविश्वास आणि उद्योगजगतातील स्पर्धात्मकतेची जाणीव निर्माण करून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सज्ज करणे हा होता.
शेवटी, त्यांनी प्रोजेक्ट बेसड लर्नींग या शिकण्याच्या महत्त्वपूर्ण तंत्रावर भर दिला. प्रोजेक्ट हे सर्व संकल्पना समजून घेण्यासाठी अनिवार्य आहे. हे अधोरेखित करून, प्रत्येक विद्यार्थ्याने प्रोजेक्टद्वारे आपली तांत्रिक क्षमता वाढवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.