पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
देशात व राज्यामध्ये ई - नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण व ई-नोटरी प्रणाली सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, पुणे शहर चे वरिष्ठ पदाधिकारी महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही, विधान भवन, मुंबई मध्ये देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निवेदन पाठवण्यात आले आहे.या प्रसंगी विक्रम चव्हाण, अंकित तिवारी,अभिजित भोसले आणि इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या सक्षम नेतृत्वाखाली देशाने व महाराष्ट्र राज्याने अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः डिजिटलीकरण आणि पारदर्शक प्रशासन या बाबतीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. ह्या सकारात्मक दिशेला पुढे नेत, निवेदन आहे की देशातील व राज्यातील चालू असलेली पारंपरिक नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण करण्यात यावे आणि ई-नोटरी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी.
सध्या राज्यात बहुतेक नोटरी प्रक्रिया पारंपरिक हस्तलिखित / मॅन्युअल पद्धतीने होत असल्यामुळे दस्तऐवजांमध्ये चुका होणे, गैरवापर किंवा छेडछाड होण्याचा धोका कायम असतो. जर नोटरी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात ई-नोटरी प्रणालीद्वारे लागू केली गेली, तर ती अधिक सुलभ, सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वसनीय बनेल.
ई-नोटरी प्रणालीचे काही संभाव्य फायदेः
१) दस्तऐवजांचे डिजिटल स्वरूपात दीर्घकालीन व सुरक्षित संग्रह.
२) दस्तऐवजांमध्ये फसवणूक, छेडछाड किंवा दुरुपयोग टाळता येईल.
३) प्रत्येक नोटरीसाठी विशिष्ट क्रमांक असलेल्या केंद्रीकृत प्रणालीची अमलबजावणी.
या प्रणालीमुळे राज्यातील नागरिकांची वेळ व पैशांची बचत होईल, तसेच डिजिटल महाराष्ट्र व ई-गव्हर्नन्स च्या उद्दिष्टांना अधिक चालना मिळेल. मंत्री महोदयांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने विचार करण्याचे आश्वासन दिले.