वाखरी, पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी, पंढरपूर येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून विविध सादरीकरणांने आणि संचलनाद्वारे शहिदांना मानवंदना देत उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने दाखवलेल्या अद्वितीय शौर्याचा स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे स्मरण करताना शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना वृद्धिंगत झाली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी संचलनाने झाली, विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना संचलन करत मानवंदना दिली. त्यानंतर देशभक्तीपर गीते व नृत्य विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय सैन्याचे शौर्य, देशप्रेम आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी शिक्षक आर. बी. भट्टाचार्य सरांनी कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन विजय’चे चित्तथरारक वर्णन करत युद्धातील भारतीय सैन्याचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. यावेळी शिक्षिका सुप्रिया कोळी यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीताने उपस्थितांना भारावून टाकले.
एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी येथे साजरा झालेला कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची नवी चेतना निर्माण करणारा ठरला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणांद्वारे कारगिलच्या शूर वीरांना मानवंदना अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रियांका बांदल, विशाल विभुते, विकी घनमंडे, वैष्णवी हजारी, ओंकार थोरवे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.