पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातील १०८ च्या रुग्णवाहिकांच्या वाहनचालकांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारला होता. यात्रा कालवधीत वारकरी -भाविकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य बीव्हीजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्याशी वाहनचालकांचा संप मिटवण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. या चर्चेतून बीव्हीजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संप मिटवण्याच्या बाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.
आषाढी वारी २०२५ पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी शासनाचा १०८ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग व राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे वारीसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उभारली आहे. यावर्षी सोहळ्यांसोबत तसेच पंढरपूर येथे १०० पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. काही रुग्णवाहिका कार्डियाक (हृदयविकार ग्रस्तांसाठी) सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिका चालकाचा संप मिटल्याने रुग्णवाहिकेच्या सेवा पूर्ववत सुरू झाल्या असून त्याचा रुग्णांना लाभ होत आहे.