पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वर्षभरात येणा-या कार्तिकी, माघी, चैत्री व आषाढी या चार मोठ्या यात्रा कालावधीत, सण, उत्सव व गर्दीच्या दिवशी दर्शनरांगेत तसेच इतर ठिकाणी बॅरीकेटींग व इतर अनुषंगीक कामे करणे आवश्यक असते. यासाठी प्रतीवर्षी विहित प्रक्रिया राबवून ई निविदा मागविण्यात येतात. त्यानुसारच सन 2025 साठी शासनाच्या प्रचलित नियमानुसार ई निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ई निविदा, या उपसमितीच्या दि.13/10/2024 रोजीच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली होती.
तद्नंतर सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून स्वेरी कॉलेज, पंढरपूर यांचेकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम रू.1.03/- कोटी इतकी होती. त्यानंतर वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून http://mahatenders.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरून दि.08 जानेवारी पासून ई निविदा मागविण्यात आल्या होत्या. तथापि, त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने नियमानुसार मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीअंती देखील प्रतिसाद न मिळाल्याने दि.11 फेब्रुवारी रोजी पुन्हा फेर ई निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये सहा ई निविदाधारकांनी सहभाग नोंदविला होता. तथापि, सहा पैकी एकच निविदाधारक तांत्रिकदृष्ट्या पात्र होत असल्याने व तांत्रिक लिफाफ्यातील कागदपत्रांमध्ये देखील प्रिटींग मिस्टेक असल्याने पुन्हा माहे मार्च, 2025 मध्ये फेर ई निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये खालील 6 ई निविदाधारकांनी सहभाग नोंदविला होता.
1. श्री गजानन साऊंड सर्व्हिस, पंढरपूर.
2. माळी डेकोरेटर्स, सांगली.
3. आनंद मंडप सांगोला.
4. शुअरशॉट इन्वेन्ट, सातारा.
5. निर्मल मंडप, सोलापूर.
6. श्रावंती मंडप व इलेक्ट्रीक डेकोरेटर्स, सोलापूर.
वरील ई निविदाधारकांचा तांत्रिक लिफाफा तपासण्यात आला. त्यामध्ये शुअरशॉट इन्वेन्ट सातारा, श्रावंती मंडप व इलेक्ट्रीक डेकोरेटर्स सोलापूर तसेच माळी डेकोरेटर्स सांगली हे तीन ई निविदाधारक तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरले असल्याने त्यांचा दरपत्रक लिफाफा उघडण्यात आला. त्यामध्ये शुअरशॉट इन्वेन्ट सातारा हे नुन्यत्तमधारक ठरल्याने त्यांची ई निविदा मंजुर करून त्यांना पुरवठा आदेश देण्यात आला आहे. त्यांचेकडून दर्शनरांगेतील कामे करून घेण्यात येत आहेत.
सदरची संपूर्ण ई निविदा ही शासनाच्या प्रचलित नियमानुसार व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून राबविण्यात आली होती. त्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहेत. त्यासंबंधिचा दस्ताऐवज शासनाच्या वरील संकेतस्थळावर व मंदिर समितीच्या अभिलेखात पाहणीसाठी उपलब्ध आहे.
तथापि, सदरचे टेंडरबाबत पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस विभागाकडे केल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेली आहे. मात्र, या कार्यालयाकडे अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. संबंधितांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर निःपक्षपाती चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच शहर पोलीस स्टेशन कडून अद्याप पर्यंत तक्रार दाखल झाले असल्याबाबत कुठलीही माहिती मंदिर समितीला मिळालेली नाही, यामध्ये कोणत्याही व्यक्तीस पाठीशी घातले जाणार नाही असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.