सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि महाराष्ट्र शासन संचलित श्री. स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅड केटरिंग टेक्नॉलॉजी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जुलै 2025 रोजी "जागतिक युवा कौशल्य विकास दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार मेळावा सोलापूर जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सचिव, हॉटेल मॅनेजमेंट असोसिएशन अमर कालेकर, आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राम वखर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सहायक आयुक्त कौशल्य विकास श्रीमती संगीता खंदारे यांनी कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने केली. त्यांनी "बेरोजगार युवक-युवतींना उद्योगसमर्थ कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या सक्षम संधी उपलब्ध करून देणे, भारत हा युवकांचा देश असुन या क्रियाशील युवकांना कुशल बनवुन कौशल्य विकसित देश बनवु" त्यामुळे भारत हा जगातील विकसित राष्ट्र बनेल आणि एक महासत्ता म्हणुन उदयास येईल हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे सांगीतले. यानंतर राम वखर्डे यांनी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत स्वयंरोजगारासाठी उपलब्ध विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित युवक-युवतींना दिली. त्यांनी बैंक व महामंडळांच्या अर्थसहाय्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच, आर - सेटी (RSETI) चे संचालक दीपक वडेवाले यांनी देखील उद्योजकता विकास व प्रशिक्षण क्षेत्रातील संधी यावर मार्गदर्शन केले. यानंतर सहसचिव, हॉटेल असोसिएशन अमर कालेकर यांनी हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात उपलब्ध असणा-या विविध रोजगार तसेच स्वयंरोजगार संधीबाबत युवक युवतींना मार्गदर्शन केले. प्राचार्य, नेहा खेडकर (स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मेळाव्यात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी तसेच, स्वयंरोजगारासाठी 136 उमेदवारांनी सहभाग नोदवला आहे.
सन्मान समारंभ कार्यक्रमात कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 03 प्रशिक्षण संस्थांचा सन्मान गौरव पत्र देवुन मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या हस्ते त्यांचा दालनामध्ये करण्यात आला. गुरुप्रसाद स्किल डेव्हलपमेंट सेंटर, पंढरपूर, सह्याद्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर, अकलूज, स्वराज्य स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, करमाळा तसेच, प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या 5 प्रशिक्षणार्थ्यांना गौरविण्यात आले जयश्री सोमनाथ झिंजुर्डे ,मीनाक्षी श्याम वाघमारे.,रोहन बळीराम भिताडे, ऋषिकेश अभिमान साबळे , अश्विनी तुषार टंकसाळे.
या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यात कार्यरत कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था आणि स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणारी विविध शासकीय महामंडळे यांनी आपले स्टॉल्स लावून प्रशिक्षण घेण्यास इच्छुक युवकांना अभ्यासक्रम, क्षेत्रीय माहिती व समुपदेशन दिले. या कार्यक्रमात शासकीय योजनांतर्गत प्रशिक्षणार्थी, बेरोजगार युवक-युवती, प्रशिक्षण संस्था चालक, आणि अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. "कौशल्यवान युवा - सक्षम भारत" या ध्येयाने प्रेरित झालेल्या या कार्यक्रमातून, जिल्ह्यातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या दिशा प्राप्त झाल्या आहेत.
अशी माहिती सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संगीता खंदारे यांनी दिली.