नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २२ जुलै रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे त्यांच्या राजीनाम्यास अधिकृत मान्यता दिली आहे. यासोबतच, देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी नवीन निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, ही निवडणूक भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२४, तसेच ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ यांच्या अधीन राहून घेतली जाणार आहे.
लवकरच निवडणूक आयोग औपचारिक अधिसूचना जाहीर करणार असून, त्यामध्ये नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख, अर्ज छाननी, माघार घेण्याची अंतिम मुदत, मतदानाचा दिनांक व मतमोजणीची प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
जगदीप धनखड यांचा कार्यकाळ संपण्यास काही महिने बाकी असतानाच त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी संभाव्य उमेदवार कोण असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.