पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भागवत धर्म व वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळा दि. 23 जुलै रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त पंढरपुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील शिंपी समाजा सर्व पोटजातीमधील दानशूर व्यक्ती, समाज बांधवांनी तन, मन, धनाने सहभागी होवून हा सोहळा भव्य दिव्य करावा असे आवाहन अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांनी केले.
संत नामदेव महाराजांच्या 675 व्या संजिवन समाधी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी समस्त शिंपी समाजाची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 4 मे रोजी प्रदक्षिणा मार्गावरील संत नामदेव महाराज मंदिरात (जन्मस्थान) सकाळी 10 वाजता संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशभ ह.भ.प. माधव महाराज नामदास यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री ह.भ.प. मुकुंद महाराज नामदास, ज्ञानेश्वर महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास, केदार महाराज नामदास, केशवराज संस्थेचे सर्वेसर्वा व एकसंघाचे राष्ट्रीय सचिव रुपेश खांडके, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव विलास पोरे, विश्वस्त महेश गानमोटे, सोलापूरचे धनंजय जवंजाळ, महेश रेळेकर, अॅड. अजय तल्लार, मनोज भांडारकर, नंदकुमार कोसमतवार, अनिल गचके, पालखी सोहळा पत्रकार संघाचे संस्थापक सुर्यकांत भिसे, खेमराज नामा, पुणे विभाग प्रमुख सागर मांडरे, कोकण विभाग प्रमुख विजय माळवदे, महिला प्रदेशाद्यक्षा रेखाताई मुळोतकर, महिला कार्यकारणी प्रमुख शीतल माळवदे, माजी अध्यक्ष चंद्रकांत निकते आदी उपस्थित होते. यावेळी 675 वा संजीवन समाधी सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी विविध कमिट्यांची घोषणा करण्यात आली.
पुढे बोलताना अॅड.महेश ढवळे म्हणाले, पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. मात्र जागेअभावी याचे काम रखडले होते. अ.भा. नामदेव क्षत्रिय एकसंघाने यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार भक्तीसागर (65 एकर) येथे रेल्वेची जागा राज्य शासनाने स्मारकासाठी निश्चित केली. स्मारकाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार असल्याचे सांगितले.
तसेच जुलै महिन्यात संत नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा पंढरपुरात भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आतापासूनच सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार असून राज्यातील शिंपी समाजातील विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, दानशूर व्यक्तींनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी तन, मन, धनाने सहभागी व्हावे. संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशाच्या विविध भागातून येणार्या बांधवांची चांगली सोय करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध कमिट्यांची घोषणा करण्यात आली असून यासाठी समाजातील युवकांनी हिरीरिने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा शासन स्तरावर साजरा होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळा यावर्षी जुलै महिन्यात असून दि. 23 व 24 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समस्त नामदास महाराज परिवार, पंढरपूर शिंपी समाज, अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री केशवराज संस्थान, संत नामदेव महाराज वारकरी-फडकरी संघटना, संत नामदेव युवक संघटना, महिला भजनी मंडळ तसेच महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाज, व सहयोगी संस्थांच्या अनमोल सहकार्याने या संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
सदर बैठकीस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून शिंपी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैठकीचे सुत्रसंचालन राजेश धोकटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रथमेश परांडकर, युवक संघटनेचे अध्यक्ष पै. शैलेश धट, केशवराज संस्थेचे सदस्य जयवंत कांबळे, पत्रकार प्रशांत माळवदे, निलेश धोकटे, प्रशांत काकडे, दत्ता चांडोले अक्षय महिंद्रकर, कृष्णा जवंजाळ, अनिल धट, सचिन बुरांडे, माऊली निकते, प्रकाश मेटकर आदींनी परिश्रम घेतले.
23 जुलै रोजी समाधी सोहळा-नामदास महाराज
यावर्षी दिनदर्शिकेमध्ये मंगळवार दि. 22 जुलै रोजी संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार द्वादशी दिवशी क्षीरापतीचा कार्यक्रम झाल्याशिवाय समाधी सोहळा साजरा केलो जात नाही. त्यामुळे सोमवार दि. 21 रोजी एकादशी दिवशी दिंडीची नगर प्रदक्षिणा, मंगळवार दि. 22 रोजी द्वादशी दिवशी क्षीरापतीचा कार्यक्रम झाल्यानंतर बुधवार दि. 23 जुलै रोजी संत नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा समस्त नामदास महाराज फडाच्यावतीने पंढरपुरात साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा समस्त शिंपी समाज बांधव व संत नामदेव भक्तांनी बुधवार दि. 23 जुलै रोजी समाधी सोहळा साजरा करावा असे आवाहन ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास यांनी केले आहे.